कळंब : शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधून त्यांना धीर देण्यासाठी इस्रायलचे कृषितज्ज्ञ कळंब तालुक्यात दाखल झाले आहे. या तज्ञांनी शेतीची पाहणी करून संबंधित शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. या तज्ज्ञांमध्ये इस्रायलचे मुख्य कार्यकारी अधिकारी गाबीन नहीम, डेव्हीड ओकेवा यांचा समावेश आहे. दोनोडा येथील शेतकरी माणिक कदम यांच्या शेतातील तूर लागवड व तूर पिकाची पाहणी या तज्ञांनी केली. याशिवाय तेथीलच नऊ शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला भेट दिली. वर्षा लिखार, कृष्णा वाडेकर, भारती पाटील यांचे त्यांनी सांत्वन करून त्यांना धीर दिला. कळंब येथील प्रगतिशील शेतकरी मुरलीधर डेहनकर यांच्या संत्रा बगेलाही त्यांनी भेट दिली. सिमेंट नालाबांध, कोठा येथील पॉली हाऊस, जरबेरा फुल शेतीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतीत विविध प्रयोग करणारे शेतकरी केशव निमकर यांच्याशी संवाद साधला. इस्रायली तंत्रज्ञान स्थानिक शेतकऱ्यांना कितपत फायदेशीर ठरू शकते, याची चाचपणी करण्यात आली. त्यांच्यासोबत महाराष्ट्राचे प्रधान कृषी सचिव अॅनी जोगळेकर, कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संचालक सी.यू. पाटील, महसूल विभागाचे उपायुक्त ठाकरे, जिल्हा कृषी अधीक्षक दत्तात्रेय गायकवाड, उपविभागीय अधिकारी जनार्धन विधाते, तहसीलदार संतोष काकडे, गटविकास अधिकारी डॉ.मनोहर नाल्हे, तालुका कृषी अधिकारी के.बी. आठवले, मंडळ कृषी अधिकारी राठी, दिनेश उगले, महेंद्र ओंकार आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
कृषितज्ज्ञांनी केली शेतीची पाहणी
By admin | Updated: January 20, 2016 03:38 IST