नागरिक प्रचंड त्रस्त : दोन एटीएमची सेवा राहते अनियमितलोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : आरमोरी शहरात राष्ट्रीयकृत व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मिळून एकूण पाच एटीएम विविध ठिकाणी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी ५०० व १००० च्या जुन्या नोटबंदीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्यानंतर राष्ट्रीयकृत बँकांसह एटीएमचीही सेवा विस्कळीत झाली. दरम्यान नोटबंदीला सात महिन्यांचा कालावधी उलटूनही आरमोरी शहरातील बँक आॅफ इंडियाचे आरमोरी पंचायत समिती परिसरात असलेले एटीएम कुलूपबंदच आहे. याशिवाय भारतीय स्टेट बँक आणि बँक आॅफ महाराष्ट्र बँकांच्या दोन एटीएमची सेवा अनियमित असते. येथे नेहमी रोकडचा तुटवडा असतो. एटीएमच्या या विस्कळीत सेवेने आरमोरीकर प्रचंड त्रस्त झाले आहेत. मात्र याकडे शासन, प्रशासनासह बँक व संबंधित यंत्रणेचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. आरमोरी शहराची लोकसंख्या सद्य:स्थितीत २७ हजारांच्या आसपास आहे. याशिवाय आरमोरी तालुक्यात ८८ गावे आहेत. वैरागड वगळता आरमोरी तालुक्यातील इतर कोणत्याही गावात एटीएमची सुविधा नाही. त्यामुळे तालुकाभरातील शेकडो नागरिक दररोज रोकड काढण्यासाठी आरमोरी शहरातील एटीएम तसेच बँकेत हजेरी लावतात. मात्र येथील बँक आॅफ इंडियाचे एकमेव एटीएम नोटबंदीनंतर सुरू झाले नाही. त्यामुळे इतर चार एटीएमवरच आरमोरी तालुक्यातील लोकांचा भार आहे. बँक आॅफ महाराष्ट्रच्या एकमेव एटीएममध्ये वारंवार तांत्रिक बिघाड निर्माण होतो. परिणामी येथे रोकड काढण्यासाठी आलेले ग्राहक आल्यापावली परत जातात. स्टेट बँक इंडियाचा एकमेव एटीएम सुरू आहे. मात्र येथे पुरेशा प्रमाणात रोकड उपलब्ध राहत नसल्याने येथील रोकड दुपारी २ वाजताच्या पूर्वीच संपते. त्यानंतर आलेल्या ग्राहकांना निराश होऊन परतावे लागते. यासंदर्भात बँक आॅफ इंडियाचे आरमोरी शाखा व्यवस्थापक डी. एस. झिरे यांना त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता, आरमोरी शहरातील बँक आॅफ इंडियाचे नोटबंदीच्या निर्णयानंतर काही दिवस सुरू होते. मात्र रोकड उपलब्ध नसल्याने हे एटीएम सध्या बंद स्थितीत आहे. सदर एटीएममध्ये रोकड टाकून ग्राहकांना लवकरच सेवा पुरवू, असे झिरे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
नोटबंदीनंतर आरमोरीतील ‘ते’ एटीएम कुलूपबंदच
By admin | Updated: June 30, 2017 01:09 IST