भूतबाधा उतरविण्यासाठी केला विधी : पंदेवाही येथील विनोबा भावे आश्रमशाळेतील प्रकाररवी रामगुंडेवार - एटापल्लीशाळेतील विद्यार्थिनीचा मलेरियाच्या आजाराने मृत्यू झाला व त्यातच ५० वर अधिक विद्यार्थिनी विविध आजाराने ग्रस्त आहेत. त्यामुळे शाळेला भूतबाधा झाली असावी, असा समज करून पंदेवाही येथील विनोबा भावे आश्रमशाळेत पुजाऱ्याला बोलावून मुख्याध्यापकासह शिक्षकांनी पूजा करवून घेतली व शाळेच्या प्रत्येक वर्ग खोलीत भारलेले लिंबू आढ्याला बांधण्यात आले. या अंधश्रध्देच्या प्रकाराची या भागात मोठी चर्चा सुरू झाली आहे. एटापल्लीपासून दोन किमी अंतरावरील पंदेवाही येथील विनोबा भावे आश्रमशाळेत वर्ग १ ते १० पर्यंत ४०० विद्यार्थी, विद्यार्थिनी शिक्षण घेत आहे. शाळेतील इयत्ता सहावीतील सुनीता कुल्ले ओकसा (१२) ही विद्यार्थिनी १ डिसेंबर रोजी मलेरियाच्या आजाराने मरण पावली. तेव्हापासून आतापर्यंत ५० वर विद्यार्थिनी विविध आजाराने ग्रस्त आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. दोन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नागपूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. शाळेचे विद्यार्थी एवढ्या मोठ्या संख्येने आजारी पडल्यामुळे शाळेला भूतबाधा झाली असावी, असा समज करून घेत शाळेच्या मुख्याध्यापकासह शिक्षक, पुजारी व पालकांनी शाळेत सभा घेऊन भूतबाधा उतरविण्यासाठी आदिवासी रितीरिवाजाप्रमाणे पूजाविधी केला व भारलेले लिंबू शाळेच्या प्रवेशद्वारासह संपूर्ण वर्गखोल्या व निवासी खोल्यांमध्ये बांधले. सर्वांच्या उपस्थितीत प्रत्येकी दोन लिंबू पांढऱ्या कापडाने आड्याला बांधण्यात आले आहे. जवळजवळ ५० ते ६० लिंबू संपूर्ण शाळा परिसरात बांधण्यात आले आहे. हा संपूर्ण अंधश्रध्देचा प्रकार शिक्षक, पालक व मुख्याध्यापक यांच्या साक्षीने पार पाडण्यात आला. शाळेसारख्या पवित्र ठिकाणी भविष्याची पिढी घडविली जाणार आहे. त्यांच्यावर विज्ञाननिष्ठ संस्कार करण्याऐवजी अंधश्रध्देचा हा कळस उभा करण्याचे काम झाल्यामुळे या भागातील सुशिक्षीत लोकांनी या प्रकाराबाबत तीव्र भावना व्यक्त केल्या आहे. या संदर्भात गुरूपल्ली ग्रामपंचायतीचे उपसरपंच दौलत दहागावकर यांनी शाळेमध्ये जर असे प्रकार घडत असले तर ही अत्यंत खेदाची बाब आहे. असे प्रकार थांबविण्यासाठी सर्वांनीच पुढाकार घ्यायला हवा, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
पूजेनंतर शाळेत लावले भारलेले लिंबू, मिरच्या
By admin | Updated: December 21, 2014 22:58 IST