गडचिरोली : ऐन दिवाळीच्या सुट्यांमध्ये ३१ आॅक्टोबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीदिनी सर्व शाळा, महाविद्यालयात राष्ट्रीय एकता दिवस साजरा करावा, तसेच या दिवसाचे औचित्य साधून ३ किमी अंतराची एकता दौड आयोजित करण्यात यावी, अशा सूचना केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सर्व शाळा, महाविद्यालय व प्रशासनाला दिल्या आहेत. सध्या दिवाळीच्या सुट्या असल्याने शाळा, महाविद्यालयाचे बहुतांश प्राध्यापक, शिक्षक तसेच विद्यार्थीही बाहेरगावी गेले आहेत. अशा सुट्यांच्या कालावधीत शाळेत व महाविद्यालयात उपस्थित राहून राष्ट्रीय एकता दिवस कसा साजरा करायचा, असा प्रश्न जिल्ह्यातील महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक, मुख्याध्यापक व शिक्षकांपुढे निर्माण झाला आहे.शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये ३१ आॅक्टोबर रोजी राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्याच्या सूचना केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयामार्फत देण्यात आल्या आहेत. सदर कार्यक्रम आयोजित केल्याबाबतचा अहवाल ४ नोव्हेंबरपर्यंत पाठविण्याच्या सूचनाही शासन, प्रशासनाने शाळा, महाविद्यालयांना दिल्या आहेत. राज्याच्या शालेय शिक्षण विभागानेही शाळांना प्रभातफेरी, एकता दौड, संचलन आयोजित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र शाळांच्या दिवाळीच्या सुट्या अद्यापही संपलेल्या नाहीत. ३१ आॅक्टोबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीदिनी राष्ट्रीय एकता दिवस साजरा करून एकता दौड कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी आज २८ आॅक्टोबर रोजी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. शालेय शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाने सदर राष्ट्रीय एकता दिवस यशस्वी करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यासंदर्भात नियोजन करण्यात आले असून सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना सूचना देण्यात आल्या आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)
राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यासाठी प्रशासनाची धडपड
By admin | Updated: October 28, 2014 22:56 IST