गडचिरोली : भारतीय संस्कृतीत मुक्या जनावरांना देवत्वाचा दर्जा देऊन त्यांची पूजा करण्याची प्रथा आजही आहे. परंतु या मुक्या प्राण्यांना मानवाकडूनच त्रास होत असेल तर त्यांच्या संगोपणाची हमी घ्यायची कुणी, असा प्रश्न उपस्थित होतो. कत्तलीसाठी अवैध तस्करी करीत असतांना खाटिकांच्या तावडीतून पोलिसांनी जनावरे सोडविली. २८ म्हशी, ४ गायी व १ बैल अशी ३३ जनावरे या कारवाईत पोलिसांनी पकडले व चंद्रपूर रस्त्यालगत असलेल्या निर्माणाधिन टाऊन हॉल परिसरात साठवून दिले. मात्र साठविलेल्या मुक्या जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था पोलीस व नगर परिषद प्रशासनाने केली नाही. मुक्या प्राण्यांच्या जीवाच्या रक्षणाची प्रशासनाला चाड आहे की नाही, असा प्रश्न सुजाण नागरिक उपस्थित करीत आहेत.जनावरांची कत्तलीसाठी अवैध तस्करी करणाऱ्या मुक्या प्राण्यांना पोलिसांनी महिनाभरापूर्वी खाटिकांच्या तावडीतून सोडविले. मात्र त्यांच्या चाऱ्याची व्यवस्था न करताच निर्माणाधिन टाऊन हॉल परिसरात तसेच चिखलाच्या विळख्यात सोडून दिले. त्यांच्या चाऱ्याची व्यवस्थाही करणे पोलीस प्रशासनाला उमजले नाही. पोलिसांनी २१ व २४ जुलै रोजी केलेल्या दोन कारवायांमधून सदर जनावरे ताब्यात घेतली होती. त्यानंतर जनावरांच्या देखभालीसाठी २७ जुलै रोजी नगर परिषदेच्या ताब्यात जनावरांना देण्यात आले. पोलिसांनी नगर परिषद प्रशासनाकडे जनावरे सुपूर्द करून आपली जबाबदारी टाळून सुस्कारा सोडला. मात्र मुक्या जनावरांच्या संगोपणाचा वाली कोण होणार याबाबत त्यांना थोडीशीही मानवता आठवली नाही. जनावरे नगर परिषदेच्या ताब्यात असल्याने त्यांच्या लिलावासाठी न्यायालयाच्या आदेशाची वाट पहावी लागत आहे. परंतु लिलावासाठी न्यायालयाचा आदेश येईपर्यंत जनावरे जीवंत राहणार की नाही, अशी स्थिती जनावरांच्या प्रकृतीवरुन निर्माण झाली आहे.जुलैच्या शेवटच्या आठवड्यात जनावरांना नवीन न. प. च्या निर्माणाधिन इमारत परिसरात साठविण्यात आले. परंतु त्यांच्या चाऱ्यासाठी न. प. ने एकदाच टॅ्रक्टरभर चाऱ्याची व्यवस्था केली. परंतु ३३ जनावरांच्या वाट्याला ट्रॅक्टरभर चारा किती येणार हे केवळ एक पशुपालकच जाणू शकतो. न. प. प्रशासन ट्रॅक्टरभर चारा देऊन मोकळे झाले. त्यानंतर एकदाही जनावरांची काळजी घेण्याचे शहाणपण न. प. प्रशासन व पोलीस अधिकाऱ्यांना आले नाही. जनावरांना साठविलेल्या परिसरात जागोजागी पाणी साचून चिखल झाल्याने साधा चाऱ्याचा एक अंशही या परिसरात उरला नाही. त्यामुळे चाऱ्यासाठी जनावरे तडफडत आहेत. न. प. ने सुरूवातीस म्हशींसाठी पाण्याची व्यवस्था एका डबक्यात केली व या जबाबदारीतून ते मोकळे झाले. मात्र मुक्या जनावरांच्या भूकेची तीव्रता असंवेदनशील असलेल्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांना कशी येणार. जनावरांच्या चाऱ्यासाठी पोलिसांनीही काहीच प्रयत्न केले नाही. केवळ खाटिकांच्या तावडीतून सोडवून कारवाई करण्यातच आपली धन्यता मानली. न. प. प्रशासनाकडे जनावरांची जबाबदारी देण्यात आली आहे, अशी कर्तव्यनिष्ट जवाबदेही स्पष्ट करीत आपली जबाबदारी पार पाडल्याचा आव आणत आपल्या कर्तव्यापासून सुस्कारा सोडला. पोलीस व न. प. प्रशासनाच्या या बेजबाबदार वागण्यामुळे मुक्या प्राण्यांना यातना भोगाव्या लागत आहेत. या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे. बेजबाबदारपणे वागणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही नागरिकांमधून होत आहे. (शहर प्रतिनिधी)
प्रशासन मुक्या प्राण्यांच्या जीवावर
By admin | Updated: August 10, 2014 22:59 IST