११९ पदे मंजूर : गुन्ह्यांच्या तपासात होत आहे विलंबअहेरी : जिल्ह्याच्या दक्षिण भागातील महत्त्वाचे पोलीस स्टेशन असलेल्या अहेरी पोलीस स्टेशनमधील ११९ मंजूर पदापैकी केवळ २५ पदे भरण्यात आली आहेत. परिणामी कार्यरत कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा बोजा पडत असून गुन्ह्यांच्या तपासातही विलंब होत आहे. गडचिरोली जिल्ह्याचा विस्तार लक्षात घेऊन गडचिरोली जिल्ह्याचे दोन पोलीस जिल्ह्यात विभाजन करण्यात आले आहे. अहेरी हा नक्षलग्रस्त तालुका म्हणून ओळखला जातो. त्याचबरोबर परिसरातील अनेक कर्मचारी अहेरी व आलापल्ली येथे राहूनच ये-जा करीत असल्याने या दोन्ही गावांची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्याचबरोबर गुन्हे घडण्याचे प्रमाणही वाढत चालले आहे. अहेरी पोलीस ठाण्याचे क्षेत्र व कामाचा व्याप लक्षात घेऊन अहेरी पोलीस स्टेशनसाठी सुमारे ११९ पदे मंजूर करण्यात आली आहेत. मात्र यातील केवळ २५ पदे भरण्यात आली आहेत. ठाण्याचा संपूर्ण कारभार सांभाळण्याची जबाबदारी ज्या ठाणेदारावर आहे, ते पदही रिक्त असल्याने प्रभारींच्या माध्यमातून काम चालविला जात आहे. या ठाण्यातील पाच पोलीस उपनिरीक्षकांपैकी केवळ एक पोलीस निरीक्षकाचे पद भरण्यात आले आहे. रिक्तपदांमुळे अहेरी, आलापल्ली परिसरात गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. गुन्ह्याचा तपास करण्यासही अक्षम्य विलंब होत आहे. (तालुका प्रतिनिधी)
२५ कर्मचाऱ्यांवर चालतो अहेरी पोलीस स्टेशनचा कारभार
By admin | Updated: June 27, 2015 02:07 IST