भामरागड : भामरागड उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय भामरागड यांच्यावतीने ताडगाव व हेमलकसा येथे आदिवासी जनजागरण मेळाव्याचे नुकतेच आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात आदिवासींना विविध योजनांची माहिती तसेच विविध दाखल्यांचे वितरण करण्यात आले. पोलीस मदत केंद्र ताडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच घेण्यात आलेल्या जनजागरण मेळाव्यात विविध शासकीय योजनांबाबत स्टॉलच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. या मेळाव्याचे उद्घाटन भामरागडचे नायब तहसीलदार गागापुरवार यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून अहेरी एसटी महामंडळाचे प्रमुख डेरकर, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे सहाय्यक कमांडंट वर्मा, खुज्जूर, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. देवारे, सरपंच चैतू आत्राम आदी मान्यवर उपस्थित होते. या मेळाव्यात वनविभाग, भूमिअभिलेख, आरोग्य तसेच पशुवैद्यकीय विभागाच्यावतीने स्टॉल लावून योजनांची जनजागृती करण्यात आली. मेळाव्यादरम्यान क्रिकेट व व्हॉलीबॉल स्पर्धा घेण्यात आल्या. हेमलकसा येथील अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ठाकुर होते. मेळाव्याचे उद्घाटन सहाय्यक कंपनी कमांडर मनिषकुमार, नायब तहसीलदार के. एन. वाढई, पशुवैद्यकीय अधिकारी वानखेडे, पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक साळूंखे,पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत इंगवले, प्रमोद जाधव, अनंत कांबळे, विश्वास आदी उपस्थित होते. मेळाव्यादरम्यान शासकीय विभागामार्फत स्टॉल लावून विविध योजनांची माहिती देण्यात आली. त्याबरोबरच पशुसंवर्धन विभाग, ग्रामीण रूग्णालय, आदिवासी विभाग, तलाठी कार्यालय, विविध उपक्रम राबविण्यात आले. मेळाव्यात आदिवासींना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले. रूग्णालयामार्फत आरोग्य तपासणी व संजय गांधी जीवनदायी योजनेची नोंदणी करण्यात आली. प्रास्ताविक व आभार संतोष मंथनवार यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)
आदिवासींना योजनांची दिली माहिती
By admin | Updated: June 28, 2014 23:34 IST