३६ कार्यकर्ते जनजागृती करणार : दारू व तंबाखूमुक्त गडचिरोलीसाठी सर्चमध्ये पहिले प्रशिक्षण शिबिरगडचिरोली : गडचिरोली जिल्हा दारू व तंबाखूमुक्त व्हावा, या उद्देशाने मागील दोन वर्षांपासून मुक्तिपथ कार्यक्रमाची तयारी सर्च, टाटा ट्रस्ट व गडचिरोली प्रशासनाच्या समन्वयातून सुरू आहे. या अनुषंगाने चातगाव नजीकच्या सर्च येथे १ ते ३ सप्टेंबर दरम्यान मुक्तिपथच्या ३६ कार्यकर्त्यांचे निवासी प्रशिक्षण पार पडले. यावेळी प्रशिक्षणार्थ्यांनी मार्गदर्शकांकडून व्यसनमुक्तीचा मूलमंत्र घेतला.दारू व तंबाखूमुक्त गडचिरोलीच्या मुक्तिपथ कार्याच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरावर कार्यगटाची स्थापना करण्यात आली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या कार्यगटाचे अध्यक्ष आहेत. तर डॉ. अभय बंग हे सल्लागार आहेत. जिल्हा पातळीवर मुक्तिपथ कार्य अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समिती गठीत करण्यात आली आहे. प्रत्येक तालुक्यात तीन कार्यकर्ते यानुसार एकूण ३६ कार्यकर्त्यांची जिल्हाभरात नेमणूक करण्यात आली आहे. मुक्तिपथचे कार्यालय प्रत्येक तालुक्यात निर्माण करण्यात आली असून तालुका कार्यालयाचे उद्घाटन पुढील महिन्यात करण्यात येणार आहे. विविध शासकीय विभाग, शिक्षण संस्था, गाव पातळीवरील संघटना व स्वयंसेवी संस्था यांच्या सहकार्यातून जिल्ह्यातील १६०० गावात दारू व तंबाखूमुक्तीबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
मुक्तिपथच्या प्रशिक्षणार्थ्यांना व्यसनमुक्तीचा मूलमंत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2016 00:51 IST