गडचिरोली : शेतकऱ्यांच्या असहायता व अज्ञानाचा फायदा उचलत खत विक्रेते शेतकऱ्यांकडून खताची छापील किमतीपेक्षा जास्त किंमत वसूल करीत असल्याचा दरवर्षीचा अनुभव आहे. यावर्षीही मात्र शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभागाने कंबर कसली असून खतांचा काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश कृषी व पशुसंवर्धन सभापती अतुल गण्यारपवार यांनी दिले आहेत. जिल्ह्यात मागील आठ दिवसापासून पावसाला जोरदार सुरूवात झाली आहे. त्यामुळे काही भागात रोवणीच्या कामालाही सुरूवात झाली आहे. पुढील आठ दिवसात सर्वच शेतकरी धान रोवणीचे काम सुरू करणार आहेत. धानाची रोवणी करतेवेळीच शेतकरी रासायनिक खते टाकतात. आजपर्यंत पावसाने दडी मारली असल्याने असंख्य शेतकऱ्यांनी खते खरेदी केले नव्हते. आता पाऊस सुरू झाल्याबरोबर खतांच्या दुकानात शेतकऱ्यांची गर्दी दिसून येत आहे. शेतकऱ्यांच्या गरजेचा व गर्दीचा फायदा खत विक्रेत्यांकडून उचलला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. कधीकधी खत उपलब्ध असतानाही खताची टंचाई असल्याचे वातावरण तयार करण्यात येते. वेळेवर खत टाकणे आवश्यक असल्याने शेतकरी कितीही किंमत देण्यास तयार होतो. अशावेळी शेतकऱ्यांकडून अधिकची किंमत आकारण्यात येते. यामुळे खत दुकानदाराचा फायदा होत असला तरी शेतकऱ्यांचे मात्र नुकसान होते. खताचा काळाबाजार थांबविण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष तथा पदाधिकारी, संवर्ग विकास अधिकारी, कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी ग्रामसेवक यांनी खत विक्री केंद्रावर स्वत: भेट देऊन खत विक्री केंद्राची तपासणी करावी. एखाद्या खत विक्रेत्यांकडून अधिकची किंमत आकारली जात असल्याचे लक्षात येताच त्याच्यावर कारवाई करावी. खत विक्रेत्याने दुकानासमोर दरफलक लावावे व शासनाच्या नियमाप्रमाणेच खताची विक्री करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती अतुल गण्यारपवार यांनी केले आहे. खतांचा काळाबाजार दरवर्षीच केला जातो. यामुळे शेतकऱ्यांची प्रचंड पिळवणूक होते. हा दरवर्षीचा अनुभव आहे. यावर्षी मात्र अशा प्रकारचा काळाबाजार होऊ नये, यासाठी कृषी विभागाने कंबर कसली आहे. त्यामुळे खताच्या काळाबाजारावर नियंत्रण राहण्यास मदत होईल, अशी अपेक्षा शेतकरी वर्गाकडून केली जात आहे. (नगर प्रतिनिधी)
काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई
By admin | Updated: July 21, 2014 00:11 IST