किराणा दुकानातून तंबाखूजन्य पदार्थांची विक्री पडली महागात
एटापल्ली येथील एक व्यावसायिक आपल्या दुकानातून तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करीत हाेता. याबाबतची माहिती मिळताच नगरपंचायत, पोलीस व मुक्तिपथ तालुका चमूने दुकानाची तपासणी केली असता सदर दुकानात एक सुगंधित तंबाखू डबा, गुडाखू व साधा तंबाखू असा एकूण २ हजार ५०० रुपयांचा तंबाखूजन्य पदार्थ मिळून आला. याप्रकरणी नगरपंचायतने संबंधित दुकानदारावर ५ हजाराचा दंड ठोठावला. तसेच पोलिसांनी पंचनामा केला असून कारवाई सुरू आहे. या मोहिमेत पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील, पोलीस उपनिरीक्षक गरकड, नगरपंचायत कर्मचारी सुरेश येरमे व मुक्तिपथ तालुका संघटक किशोर मलेवार सहभागी झाले. कोरची शहरातील ग्रामीण रुग्णालयासमोर एक इसम खर्रा विक्री करीत असल्याची माहिती नगरपंचायत, पाेलीस स्टेशन व मुक्तिपथ चमूला मिळाली. त्यानुसार पथकाने सदर व्यक्तीची तपासणी केली असता त्याच्याकडे २१ खर्रे आढळून आले. त्याच्याकडील खर्रे जप्त करीत ५०० रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. या मोहिमेत स्थानिक पोलीस स्टेशनचे कर्मचारी, नगरपंचायत व मुक्तिपथ तालुका चमू सहभागी झाली. कोरोना महामारीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यास बंदी घातली आहे. तरीसुद्धा नियमांचे उल्लंघन करीत खर्रा विक्री जाेमात सुरू आहे. कारवाई टाळण्यासाठी पुन्हा तंबाखूजन्य पदार्थांची विक्री न करण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.