काम प्रगतिपथावर : १७४ डॉक्टर व कर्मचारी लागणारदिलीप दहेलकर - गडचिरोलीकेंद्र शासनाच्या निधीतून गडचिरोली येथे २०१०-११ या वर्षात स्वतंत्र महिला व बाल रूग्णालयाला मंजुरी देण्यात आली. त्यानंतर २०१२-१३ मध्ये सुधारित प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर या रूग्णालयाचे काम सुरू करण्यात आले. सद्य:स्थिती या रूग्णालयाचे पहिल्या टप्प्यातील ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. या रूग्णालयासाठी २६ वैद्यकीय अधिकारी व १ ते ४ चे एकूण कर्मचारी १४८ असे एकूण १७४ कर्मचारी या रूग्णालयात आरोग्य सेवेसाठी लागणार आहेत. पहिल्या टप्प्यातील काम ३० सप्टेंबर २०१४ पर्यंत पूर्ण होणार आहे. सदर सुसज्ज रूग्णालय येत्या काही दिवसात गडचिरोलीकरांच्या सेवेत उभे राहणार आहे.गडचिरोलीच्या महिला व स्त्री रूग्णालयासाठी केंद्र शासनाकडून राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत एकूण १८ कोटी ७७ लक्ष रूपायचा निधी मंजूर झाला आहे. सदर रूग्णालयाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियंत्रणात खासगी कंत्राटदारांमार्फत सुरू आहे. आतापर्यंत या रूग्णालयाच्या बांधकामात दोन्ही टप्पे मिळून ९ कोटी ४० लक्ष रूपये खर्च झाले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सदर महिला व बाल रूग्णालयासाठी ३ मजल्याची इमारत उभारण्याचे काम सुरू आहे. या इमारतीत तळमजल्यावर स्वागत कक्ष, बाह्यरूग्ण विभाग, एक्स-रे कक्ष, पॅथालॉजी व ब्लडबँक, स्वयंपाकगृह तसेच मेडीकल स्टोअर्स व कार्यालय राहणार आहे. पहिल्या मजल्यावर ५ स्पेशालिस्ट डॉक्टरांचे बाह्य रूग्ण विभाग राहणार असून याच मजल्यावर दोन शस्त्रक्रिया कक्षही ठेवण्यात येणार आहे. याशिवाय ९ बेडचे प्रसुती वार्ड, ३१ बेडचे पीएमसी वार्ड, १४ बेडचे नवजात शिशू वार्ड, २४ बेडचे शस्त्रक्रिया रूग्ण वार्ड तसेच २४ बेडचे स्वतंत्र कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया कक्ष राहणार आहे. दुसऱ्या मजल्यावर ३१ बेडचे प्रसुती पश्चात वार्ड, २४ बेडचा लहान मुलांचे वार्ड, ३ विशेष वार्ड आणि एका खोलीत रेकॉर्ड कक्ष राहणार आहे. शासनाच्यावतीने सदर महिला रूग्णालय १०० खाटांचे मंजूर करण्यात आले होते. मात्र सुधारित प्रस्तावात बाल रूग्णालयाचा समावेश करण्यात आल्याने या रूग्णालयातील एकूण खाटांची संख्या १३८ इतकी राहणार आहे. या रूग्णालयाच्या कामात महिनाभरापूर्वी एकूण ४०० मजूर लावण्यात आले होते. मात्र आता पावसाळ्याचे दिवस असल्याने रोवणी हंगामामुळे या रूग्णालय उभारणीच्या कामावरील मजुरांची संख्या कमी झाली आहे. सद्य:स्थितीत या इमारतीच्या कामावर नियमित १२० मजूर काम करीत असल्याची माहिती मिळाली आहे. गडचिरोली जिल्हा सामान्य रूग्णालय गडचिरोली शहरापासून ५ किमी अंतरावर आहे. या रूग्णालयात आरोग्य सेवा घेण्यासाठी शहरवासीयांना धावपळ करावी लागते. तसेच शहरात कोणत्याही शासकीय यंत्रणेमार्फत बाह्यरूग्ण विभागाची व्यवस्था नाही. यामुळे शहरातील रूग्णांना जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या बाह्यरूग्ण विभागात रिघ लावावी लागते. त्यामुळे नव्यानेच सुरू होत असलेल्या स्वतंत्र महिला व बाल रूग्णालयात शहरातील रूग्णांसाठी बाह्यरूग्ण विभागाची व्यवस्था केल्यास शहरातील रूग्णांना आरोग्य सेवेसाठी सोयीचे होईल. यासाठी आरोग्य विभागाने शासनाकडे पाठपुरावा करण्याची गरज आहे. विशेष बाब म्हणून शासनाने या रूग्णालयातहील कोणत्याही एका गाळ्यात बाह्यरूग्ण विभाग निर्माण करावा, अशी मागणी होत आहे.
९0% काम पूर्ण
By admin | Updated: August 13, 2014 23:51 IST