१६ कोटींचा खर्च : कुनघाडा (रै.) ग्रा. पं. ने पुरविला सर्वाधिक रोजगारलोमेश बुरांडे चामोर्शीमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत चामोर्शी तालुक्यात २०१५-१६ या आर्थिक वर्षात ९९० कामे मंजूर करण्यात आली होती. त्यापैकी ८२४ कामे पूर्ण झाली आहेत. या कामांवर वर्षभरात १६ कोटी ६७ लाख रूपयांचा खर्च झाला आहे. १६६ कामे अपूर्ण राहिली असून यातील काही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होतील, अशी अपेक्षा रोहयोच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. ग्रामीण भागातील रोजगाराची समस्या सोडविण्यासाठी केंद्र शासनाने महात्मा गांधी रोजगार हमी योेजना सुरू केली आहे. चामोर्शी तालुक्यात एकूण ७६ ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायती अंतर्गत ५३ सिंचन विहिरी मंजूर करण्यात आल्या होत्या. त्यापैकी ११ सिंचन विहिरींचे काम पूर्ण झाले असून ४२ कामे अपूर्ण आहेत. शेततळ्याची १३ कामे हाती घेण्यात आली होती. त्यापैकी ९ कामे पूर्ण झाली आहेत. तर ४ कामे अपूर्ण राहिली आहेत. ६१ बोडी दुरूस्तीच्या कामांना मंजुरी देण्यात आली होती. त्यापैकी ५३ कामे पूर्ण झाली आहेत. ८ कामे अपूर्ण आहेत. मजगीची ८२६ कामे मंजूर करण्यात आली होती. त्यापैकी ७४५ कामे पूर्ण झाली आहेत. तर ८१ कामे अपूर्ण आहेत. ३६ रस्त्यांच्या कामांपैकी ६ पूर्ण तर ३१ कामे अपूर्ण आहेत. एकूण १६६ कामे अपूर्ण आहेत. दुष्काळाचा फटका चामोर्शी तालुक्यालाही बसला आहे. या तालुक्यात धान पिकाचे उत्पादन घेतले जाते. मात्र कमी पावसामुळे धानाच्या उत्पादनात कमालीची घट झाली आहे. परिणामी अल्पभूधारक शेतकरी व शेतमजूर कामाच्या शोधात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी रोजगार हमी योजनेच्या कामाची मागणी वाढली आहे. अनेक गावांमध्ये रोजगार हमीची कामे सुरू असल्याचे दिसून येते.
चामोर्शी तालुक्यात रोजगार हमी योजनेची ८२४ कामे पूर्ण
By admin | Updated: April 13, 2016 01:42 IST