गडचिरोली : ग्रामीण भागात दहन-दफनभूमी आणि त्या मार्गाची दुरवस्था दूर करण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ८१ प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा परिषदेकडे पाठवले. परंतु, पंचायत विभागाने त्यातील बहुतांश प्रस्तावांवर कोणतीही कार्यवाही केली नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे याही पावसाळ्यात नागरिकांचे हाल होणार आहेत. ग्रामीण भागात अनेक गावांमध्ये स्मशानघाटाकडे जाणारा रस्ता कच्चा आहे. पावसाळ्यात तर या चिखलमय रस्त्यावरून अंत्ययात्रा नेताना गावकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. ही स्थिती दूर करण्यासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात प्रस्ताव येतात. जिल्हा नियोजन समितीत त्यावर चर्चा होऊन पालकमंत्र्यांनी फेब्रुवारी २०२१मध्ये जिल्हा वार्षिक योजनेतून वर्ष २०१९-२०करिता जवळपास पावणेचार कोटींच्या कामांची यादी पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा परिषदेकडे पाठवली. पंचायत विभागाने त्यानुसार तातडीने कामे सुरू केली असती तर आतापर्यंत अर्धीअधिक कामे आटोपली असती. पण मे महिना उजाडला तरी ही कामे प्रलंबित आहेत. या संदर्भात उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) माणिक चव्हाण यांना विचारणा करण्यासाठी संपर्क केला, मात्र त्यांनी फोनला प्रतिसाद दिला नाही.
महिनाभरात पावसाळ्याला सुरूवात होईल. त्यापूर्वी ही कामे पूर्ण झाल्यास पावसाळ्यात होणारी गैरसोय दूर होईल.