कामांना सुरुवात : किमान तीन महिने मिळणार रोजगारतळोधी (मो.) : मातीकाम, रस्ते दुरूती, बोडींचे खोलीकरण करण्यासाठी २०१५-१६ या वर्षात ७८ लाख ३५ हजार ४०५ रूपयांची २० कामे मंजूर करण्यात आली आहेत. या कामाला शुभारंभ झाला असून सदर कामे किमान तीन महिने चालण्याची शक्यता प्रशासनाने वर्तविली आहे. दुष्काळाच्या परिस्थितीत रोहयो कामे सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. ७८ लाखांच्या या कामामध्ये मजगीची एकूण १६, रस्ते दुरूस्ती ३ व १ विहीर बांधण्यात येणार आहे. तळोधी गावातील बहुतांश शेतकरी धानाची शेती करतात. काही शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे. मात्र पारे टाकून धानाची बांधी तयार करण्यासाठी शेतकऱ्यांजवळ पैसे नसल्याने सदर जमीन पडीत राहत होती. रोहयोच्या माध्यमातून मात्र आता पारे टाकून दिले जाणार आहे. त्यामुळे सदर जमिनीवर आता धानाचे पीक घेणे शक्य होणार आहे. विलास कुनघाडकर यांच्या शेतातील कामापासून रोहयो कामाची सुरुवात करण्यात आली. पहिल्याच दिवशी सुमारे १७७ मजुरांनी कामावर हजेरी लावली. तळोधी येथे एकूण १ हजार १७० जॉबकार्डधारक आहेत. यासर्वच मजुरांना कामे उपलब्ध करून दिल्या जातील, अशी माहिती सरपंच माधुरी सूरजागडे यांनी दिली आहे. कामाच्या शुभारंभाप्रसंगी उपसरपंच किशोर गटकोजवार, ग्रा. पं. सदस्य गीता सूरजागडे, लक्ष्मी सातपुते, रोजगार सेवक जीवन कुनघाडकर यांच्यासह गावातील नागरिक व रोजगार हमी योजनेचे मजूर उपस्थित होते. (वार्ताहर)
तळोधी येथे ७८ लाखांची रोजगार हमीची कामे
By admin | Updated: December 25, 2015 02:06 IST