५९ पदे : आरोग्य विभागाची नोकर भरती गडचिरोली : आरोग्य विभागाच्या वतीने जिल्हा सामान्य रूग्णालय गडचिरोली तसेच जिल्ह्यातील इतर उपजिल्हा व ग्रामीण रूग्णालयात रिक्त असलेल्या वर्ग ड च्या विविध पदांसाठी २२ जानेवारी २०१६ रोजी रविवारला गडचिरोली शहराच्या विविध केंद्रांवरून लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. या केंद्रांवरून अर्ज केलेले एकूण ७ हजार २२६ उमेदवार ही परीक्षा देणार आहेत. आरोग्य विभागातील वर्ग ४ मधील कक्ष सेवक, सफाईगार तसेच मलेरिया, फायलेरिया वर्कर तसेच इतर तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या एकूण ५९ जागा भरण्यासाठी ही पदभरती घेण्यात येत आहे. कक्ष सेवक व सफाईगाराच्या २० पदांसाठी ३ हजार २५० उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र झाले आहेत. या उमेदवारांचा लेखी पेपर सकाळी ११ ते २ या वेळेत होणार आहे. तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या ३९ पदांसाठी ३ हजार ९७६ उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. सदर उमेदवारांची दुपारी ३ ते ५ या वेळेत विविध केंद्रांवरून लेखी परीक्षा होणार आहे. जिल्हा सामान्य रूग्णालय प्रशासनाच्या वतीने सदर पदभरतीची लेखी परीक्षेसा निकोप व शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे यांच्या नेतृत्वात नियोजन करण्यात आले आहे. (स्थानिक प्रतिनिधी) बेरोजगारी वाढतीवरच गडचिरोली जिल्ह्यात कोणतेही मोठे उद्योगधंदे नसल्याने येथील सुशिक्षीत युवक व युवतीत पोलीस, आरोग्य, वन तसेच जि.प. पद भरतीत नेहमी उतरतात. आता आरोग्य विभागातर्फे ५९ पदांसाठी सात हजारवर उमेदवार परीक्षा देणार आहेत. या आकड्यावरून जिल्ह्यात बेरोजगारांची संख्या मोठी असल्याचा प्रत्यय येतो.
७ हजार २२६ उमेदवार देणार लेखी परीक्षा
By admin | Updated: January 22, 2017 01:40 IST