नव्याने गुन्हा दाखल : एसीबी गडचिरोलीची माहितीगडचिरोली : गडचिरोली येथील सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक १ चे कार्यकारी अभियंता श्रीकांत बाळकृष्ण डेकाटे यांच्याकडे ७ लाख १० हजार ३०० रूपयांची अपसंपदा आढळून आल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. याप्रकरणी गडचिरोली पोलीस ठाण्यात सोमवारी नव्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कार्यकारी अभियंता श्रीकांत बाळकृष्ण डेकाटे याला २९ आॅक्टोबर रोजी ४८ हजार रूपयांच्या लाचेची मागणी केल्यासंदर्भात अटक करण्यात आली होती. महसूल विभागाचे निवासस्थान बांधकाम करणाऱ्या कंट्रक्शन कंपनीला २४ लाख रूपयांचे बिल मंजूर करण्याच्या कामासाठी २ टक्के प्रमाणे ४८ हजार रूपयांची मागणी कार्यकारी अभियंता डेकाटे यांनी केली होती. त्यानंतर त्यांना ४८ हजारांची लाच स्वीकारताना पंचाच्या समक्ष अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या गडचिरोली व नागपूर येथील निवासस्थानाची झडती घेतली असता, ७ लाख १० हजार ३०० रूपयांची रोख अपसंपदा आढळून आली.श्रीकांत डेकाटे हे २७ जुलै २०१५ ते २९ आॅक्टोबर २०१५ या कालावधीत कार्यरत होते. या काळात त्यांनी ही ७ लाख १० हजार ३०० रूपयांची संपत्ती मिळविली, असेही एसीबीने म्हटले आहे. याप्रकरणात गडचिरोली पोलीस ठाण्यात लाच प्रतिबंधक कायदा १९८८ चे कलम १३ (१) (ई) सह १३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास एसीबीचे पोलीस निरीक्षक दामदेव मंडलवार करीत आहे. दरम्यान सोमवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे डेकाटेला जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला. (जिल्हा प्रतिनिधी)
कार्यकारी अभियंत्याकडे आढळली ७ लाख १० हजारांची अपसंपदा
By admin | Updated: November 3, 2015 00:39 IST