आरोग्य यंत्रणेचे विशेष लक्ष : जंगल व धान बांध्यांचा परिणाम; जनजागृतीचा अभाव गडचिरोली : जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आलेल्या पाहणीदरम्यान जिल्ह्यातील ६६९ गावांमध्ये मलेरिया जंतुंचा वार्षिक निर्देशांक ५० पेक्षा अधिक आढळून आला आहे. त्यामुळे या गावांना मलेरियादृष्ट्या संवेदनशील गावे म्हणून घोषित करण्यात आली आहेत. पावसाळ्यादरम्यान या गावांमध्ये मलेरियाचा प्रकोप होण्याची सर्वाधिक शक्यता राहत असल्याने आरोग्य विभागाच्या वतीने या गावांमध्ये विशेष उपाययोजना करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये धानाची शेती केली जाते. त्याचबरोबर येथील अधिकचे पर्जन्यमान, दमट वातावरण, गावाच्या सभोवताल असलेले जंगल तसेच नागरिकांमध्ये आरोग्याच्या काळजीबाबत असलेल्या जनजागृतीचा अभाव यामुळे गडचिरोली जिल्ह्यात दरवर्षी पावसाळ्यादरम्यान मलेरिया रोगाचा प्रकोप सुरू होतो. हा प्रकोप जुलैपासून आॅक्टोबर, नोव्हेंबर महिन्यापर्यंत कायम राहतो. त्यातही जंगलव्याप्त असलेल्या तालुक्यांमधील गावांमध्ये प्रकोप अधिक असल्याचे दिसून येते. ज्या गावांचा वार्षिक जंतू निर्देशांक ५० पेक्षा अधिक आहे, अशा गावांना आरोग्य विभाग ‘ए’ श्रेणीमध्ये टाकते. गडचिरोली जिल्ह्यात अशा प्रकारची ६६९ गावे आहेत. १० ते ५० पर्यंतचा जंतू निर्देशांक असलेल्या गावांना ‘बी’ श्रेणीमध्ये तर १ ते १० वार्षिक जंतू निर्देशांक असलेल्या गावांना ‘सी’ श्रेणीमध्ये टाकले जाते. यातील ‘ए’ श्रेणीमध्ये मोडणारी गावे मलेरिया रोगाच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील समजली जातात. त्यामुळे या गावांवर पावसाळ्याच्या दिवसात आरोग्य विभागाच्या वतीने विशेष लक्ष ठेवले जात आहे. तेथील नागरिकांमध्ये मलेरियाबाबत जनजागृती करण्याबरोबरच वेळोवेळी रक्त घेऊन मलेरिया झाला असल्याचे लक्षात येताच वेळीच उपाययोजना केली जात आहे. (नगर प्रतिनिधी) मलेरिया ट्रॉपिक बेल्टमध्ये गडचिरोली देशामध्ये ओडिशा ते तेलंगणादरम्यानचा उभा पट्टा हा मलेरियासाठी संवेदनशील मानला जातो. त्यामध्ये महाराष्ट्रातील गडचिरोली, गोंदिया, भंडारा व चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश होतो. त्यातही गडचिरोली जिल्ह्याचे पर्जन्यमान सर्वाधिक आहे. धानाचे क्षेत्र असल्याने धानाच्या बांधीमध्ये चार महिने पाणी राहते. जनजागृतीअभावी येथील नागरिक मलेरिया झाल्यानंतर आरोग्यविषयक तपासणी करीत नाही. आदी कारणांमुळे राज्याच्या इतर कोणत्याही जिल्ह्यांपेक्षा गडचिरोली जिल्ह्यात मलेरियाचे रुग्ण सर्वाधिक आढळून येतात. सहा महिन्यांत ४ हजार १४७ रुग्ण पॉझिटिव्ह हिवताप कार्यालय तसेच इतर आरोग्य यंत्रणेच्या वतीने १ जानेवारी ते ३० जूनपर्यंत ३ लाख ८८ हजार ८८७ रक्ताचे नमूने घेण्यात आले. त्यापैकी ४ हजार १४७ नमूने पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. मागील वर्षीसुद्धा याच कालावधीत २ लाख ६२ हजार ९८८ रक्त नमूने घेण्यात आले होते. त्यापैकी ६ हजार ९८६ रक्त नमूने मलेरिया पॉझिटिव्ह आढळून आले. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी मलेरिया पॉझिटिव्ह नमून्यांची संख्या २ हजार ८३९ ने कमी आहे. गडचिरोली जिल्ह्यातील वातावरण मलेरियासाठी पोषक आहे. मात्र नागरिकांनी झोपताना मच्छरदानीचा वापर करणे, ताप आल्यास वेळीच रक्ततपासणी करून घेऊन औषधोपचार घेतल्यास मलेरिया रोगावर वेळीच प्रतिबंध घालता येते. जिल्ह्यात ७२१ हंगामी स्वरूपाचे कर्मचारी नेमले आहेत. ते नागरिकांचे रक्त नमुने घेणे, समुपदेशन करणे, डास उत्पत्ती स्थाने कमी करणे, गप्पी मासे सोडणे, आरोग्य विषयक जनजागृती करणे आदी कामे करीत आहेत. त्यामुळे कोरची वगळता इतर तालुक्यांमध्ये मलेरिया यावर्षी नियंत्रणात आहे. - एस. जे. पांडे, जिल्हा हिवताप अधिकारी गडचिरोली
६६९ गावे मलेरियाग्रस्त
By admin | Updated: July 29, 2016 01:08 IST