गडचिरोली : उन्हाळ्यात वन्य प्राण्यांना भेडसावरणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन यावर्षीच्या उन्हाळ्यापूर्वी ६२ पाणवठे, चार बंधारे व १० वन तलाव बांधण्याचे नियोजन वन विभागाने केले आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे ७८ टक्के क्षेत्रफळ जंगलाने व्यापले आहे. या जंगलामध्ये विविध प्रकारचे वन्य जीवही आहेत. उन्हाळ्यामध्ये जंगलातील तलाव व इतर पाण्याचे साठे आटत असल्याने वन्य प्राण्यांना फार मोठ्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. पाण्यासाठी वन्यजीव गावांमध्ये येतात. यामुळे त्यांच्यावर कुत्र्यांकडून किंवा मानवांकडून हल्ले होतात. यामध्ये दरवर्षी अनेक वन्यप्राण्यांना आपला जीव गमवावा लागत असल्याचे घटना घडतात. वन्य जीवांना पाण्याची जंगलामध्येच सोय झाल्यास वन्यजीव गावाकडे धाव घेणार नाही. त्याचबरोबर त्यांचा पाण्यावाचून मृत्यूही होणार नाही. यासाठी वन विभागाकडून दरवर्षी पाणवठे बनविले जातात. ज्या भागात जलसाठे नाहीत, अशा जंगल भागामध्ये ६२ पाणवठे बांधण्यात येणार आहेत. त्याचबरोबर जंगलातील नाल्यांवर चार बंधाऱ्यांचे बांधकाम केले जाणार आहे. जिल्हा योजनेंतर्गत जंगलामध्ये १० वनतलाव खोदण्यात येणार आहेत.उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाई भासत असल्याने त्यापूर्वीच कोणत्याही परिस्थितीत पाणवठ्यांचे बांधकाम करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने वन विभागाने नियोजन केले असून कोणत्या परिसरात सर्वाधिक पाण्याची टंचाई भासणार आहे, याचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू झाले आहे. सर्वेक्षण तत्काळ आटोपून बांधकामास सुरूवात केली जाणार आहे. (नगर प्रतिनिधी)
वन्य प्राण्यांसाठी ६२ पाणवठे
By admin | Updated: January 20, 2015 00:05 IST