गडचिरोली : पंडित दीनदयाल अंत्योदय योजना व राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत नगर परिषद गडचिरोली व जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र गडचिरोली यांच्या वतीने पोटेगाव मार्गावरील गोंडवाना कला दालनात शुक्रवारी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यादरम्यान सुमारे ६१ बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. तर ७०० पेक्षा अधिक युवक या मेळाव्याला उपस्थित होते. मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक जे. पी. बाबारे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे उपसंचालक सुनिल काळबांधे होते. प्रमुख अतिथी म्हणून औद्योगिक प्रशिक्षण संस्था गडचिरोलीचे के. एस. विसाळे, जिल्हा कौशल्य विकास रोजगार चंद्रपूरचे सहायक संचालक भाग्यश्री वाघमारे, जिल्हा कौशल्य विकास रोजगार गडचिरोलीचे सहायक संचालक देशमाने, मुख्याधिकारी कृष्णा निपाने, कौशल्य विकास अधिकारी योगेंद्र शेंडे, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानचे व्यवस्थापक विशाल गजभिये, गणेश नाईक, माविमच्या कांता मिश्रा आदी मान्यवर उपस्थित होते. बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या या उद्देशाने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याला एसआयएस सेक्युरिटी कंपनी हैदराबाद, नवभारत फर्टीलायझर नागपूर, कॅप्सस्टॉन सेक्युरिटी कंपनी बंगरूळ, एसबीआय लाईफ इन्सुरन्स कंपनी, एलआयसी, हाय एन मीडिया टेक्नालॉजी नागपूर, धृत ट्रान्समीशन कंपनी आदी नऊ कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सुमारे १ हजार १५० जागा उपलब्ध होत्या. जिल्ह्यातील व शहरातील ७०० पेक्षा अधिक बेरोजगारांनी मेळाव्याला हजेरी लावली होती. मेळाव्यात उपस्थित असलेल्या युवकांना रोजगार, स्वयंरोजगार याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या मेळाव्यादरम्यान एसआयएस सेक्युरिटी कंपनीमध्ये २४ युवकांची निवड झाली. सुमारे १५० युवकांनी अर्ज केला होता. कॅप्सस्टॉन पब्लिसीटी मॅनेजमेंट प्राईव्हेट लिमिटेडमध्ये २५ युवकांची निवड झाली. या कंपनीकडे १२५ युवकांनी अर्ज केला आहे. नवभारत फर्टीलायझर कंपनीमध्ये विक्री अधिकारी म्हणून ८० युवकांनी अर्ज केला होता. त्यापैकी १२ जणांची निवड करण्यात आली. संचालन केंद्र प्रमुख गौतम मेश्राम तर आभार सुनिल घोसे यांनी मानले. यशस्वीतेसाठी बंडू ताकसांडे, शशी गजभिये, छगन काळबांधे, दिनकर धोटे, मुंगसू मडावी, जयंत मेश्राम, रवींद्र वाठोरे, अतुल वऱ्हेकर, भोलानाथ नवले, भांडेकर यांनी सहकार्य केले. महामंडळांकडे कर्जासाठी १२० अर्ज या मेळाव्यात शबरी महामंडळाकडे २०, अण्णाभाऊ साठे महामंडळाकडे १५, इतर मागासवर्गीय महामंडळाकडे २०, संत रोहिदास महामंडळाकडे १५, वसंतराव नाई महामंडळाकडे १० व सर्व बँकांकडे ४० असे एकूण १२० अर्ज कर्जासाठी प्राप्त झाले आहेत.
६१ बेरोजगारांना मेळाव्यात मिळाला रोजगार
By admin | Updated: January 21, 2017 01:47 IST