गडचिराेली तालुक्यातील मरेगाव येथे अवैध दारूविक्री केली जाते. या गावातील दारू विक्रेते अमिर्झा, रानखेडा, मौशिखांब, टेंभा, चांभार्डा आदी गावात अवैध दारू पुरवठा करतात. त्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. अवैध दारूविक्रेत्यांना धडा शिकवण्यासाठी मुक्तिपथ तालुका चमू व गाव संघटनेने अहिंसक कृती करण्याचे ठरविले. त्यानुसार मौशीचक-मरेगाव जंगल परिसरात शोधमोहीम राबविली असता नाल्यालगत प्लास्टिकच्या ड्रममध्ये मोहसडवा टाकलेला दिसून आला. जवळपास सहा क्विंटल मोहसडवा व साहित्य आढळून येताच ते जागीच नष्ट करण्यात आले. ही कारवाई मुक्तिपथ तालुका संघटक अमोल वाकुडकर, उपसंघटक रेवनाथ मेश्राम व महिलांनी केली.
सिरोंचा तालुक्यातील रंगधामपेठा माल येथे पोलीस पाटील व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्त कृती करीत एकाच्या घरातून ६० लीटर दारू जप्त केली. तसेच ३०० लीटर गुळाचा सडवा नष्ट केला. आसरअल्ली पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या रंगधामपेठा येथे अवैध दारूविक्री बंद आहे. मात्र एक दारूविक्रेता घरातच गुळाचा सडवा टाकून दारू गाळत असल्याची माहिती गाव संघटनेने मुक्तिपथ तालुका चमूला दिली. गावचे पोलीस पाटील श्रीधर वनमामुला व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्त कृती करण्याचे नियोजन केले. त्यानुसार एका घराची पाहणी केली असता घराच्या पाठीमागे ३०० लीटर गुळाचा सडवा व ६० लीटर दारू आढळून आली. संपूर्ण गुळाचा सडवा व दारू गाळण्याचे साहित्य नष्ट करण्यात आले. या घटनेची माहिती असरअल्ली पोलिसांना देऊन जप्त केलेली दारू पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आली.
बाॅक्स
झिंगानुरात ७० हजारांचा तंबाखूजन्य पदार्थ जप्त
सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर येथील वेगवेगळ्या तीन दुकानातून जवळपास ७० हजारांचा तंबाखूजन्य पदार्थ जप्त करून नष्ट करण्यात आला. ही कृती झिंगानूर गाव संघटना व मुक्तिपथ तालुका चमूने केली. जप्त केलेल्या वस्तूंमध्ये मजा, इगल, राजश्री तंबाखू, बैलजोडी तंबाखू, तपकीर पॉकेट, तपकीर डब्बे आदी तंबाखूजन्य पदार्थांचा समावेश आहे. गावात पुन्हा तंबाखूजन्य पदार्थांची विक्री न करण्याची तंबी देण्यात आली.
===Photopath===
300421\30gad_4_30042021_30.jpg
===Caption===
रंगधामपेठा येथे जप्त केलेला गुळाचा सडवा.