आरोग्यसेवा कुचकामी : उपचारासाठी रूग्णांची शहरात धावसिरोंचा : गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या सिरोंचा तालुक्यात आरोग्य विभागात विविध संवर्गाची ४९ पदे रिक्त असल्याने या भागातील आरोग्य सेवा कुचकामी ठरत आहे. परिणामी दुर्गम भागातील रूग्णांना उपचारासाठी इतर तालुके व जिल्हा मुख्यालयात धाव घ्यावी लागत आहे. सिरोंचा तालुक्यात वर्ग २ अ वैद्यकीय अधिकाऱ्यांची सहा पदे मंजूर आहेत. त्यापैकी तीन पदे भरण्यात आली आहेत. टेकडाताला, मोयाबीनपेठा, झिंगानूर येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पद रिक्त आहे. वैद्यकीय अधिकारी वर्ग २ ब ची एकूण नऊ पदे मंजूर आहेत. यापैकी नरसिंहापल्ली प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याचे पद भरण्यात आले नाही. औषधी निर्मात्यांच्या एकूण १० पदांपैकी विठ्ठलरावपेठा व नरसिंहापल्ली येथील पदे रिक्त आहेत. प्रयोगशाळा तंत्रज्ञाच्या एकूण चार पदांपैकी टेकडाताला येथील पद रिक्त आहे. महिला आरोग्य सहाय्यकाच्या चार जागांपैकी अंकिसा, मोयाबीनपेठा प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रत्येकी एक पद रिक्त आहे. पुरूष आरोग्य सहाय्यकाच्या सहा जागांपैकी तालुका अधिकारी कार्यालय सिरोंचा तसेच टेकडाताला व झिंगानूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील पदे रिक्त आहेत. पुरूष आरोग्य सेवकांच्या एकूण ३५ पदांपैकी १६ पदे भरण्यात आली आहेत. मात्र १९ पदे अजूनही रिक्त आहेत. महिला आरोग्य सेवकांची दोन पदे तसेच कनिष्ठ सहाय्यकाचे झिंगानूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील पद रिक्त आहे. परिचराच्या ३५ पदांपैकी २० पदे भरण्यात आली असून १५ पदे रिक्त आहेत. तालुक्याच्या आरोग्य विभागात एकूण १६५ पदांपैकी ११६ पदे भरण्यात आली आहेत तर ४९ पदे रिक्त आहेत.
सिरोंचा तालुक्यात ४९ पदे रिक्त
By admin | Updated: November 27, 2015 01:49 IST