गडचिरोली : पोलीस अधीक्षक कार्यालय गडचिरोलीच्या प्रांगणात बुधवारी सकाळी पोलीस हुतात्मा स्मृती दिन कार्यक्रम घेण्यात आला. १ सप्टेंबर २०१४ ते ३१ आॅगस्ट २०१५ या कालावधीत भारतात पोलीस दलात शहीद झालेल्या ४३४ अधिकारी, कर्मचाऱ्यांना मानवंदना देण्यात आली. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी रणजितकुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक (प्रशासन) मंजुनाथ शिंगे आदी उपस्थित होते. मान्यवरांनी शहीदांच्या स्मृतिस्तंभास पुष्पचक्र वाहून श्रध्दांजली वाहिली. पोलीस उपअधीक्षक (गृह) गणेश बिरादार यांनी हुतात्मा दिनाचे महत्त्व विशद केले. गडचिरोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांनी शहीद अधिकारी, कर्मचारी यांच्या नावाचे वाचन केले. त्यानंतर शहीद जवानांना पोलीस पथकाद्वारे बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. कार्यक्रम संपताच मान्यवरांनी प्रत्यक्ष शहीद पोलीस अधिकारी/कर्मचारी यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्या अडीअडचणी समजावून घेतल्या व त्या निराकरण करण्याचे आश्वासन दिले. यावेळी शहीद परिवारातील सदस्य, पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)
पोलीस मुख्यालयात ४३४ अधिकारी, कर्मचाऱ्यांना मानवंदना
By admin | Updated: October 22, 2015 02:01 IST