जिल्हा पाेलीस अधीक्षक अंकित गाेयल यांनी १९ सप्टेंबर राेजी दुसऱ्या कृषी दर्शन सहल व अभ्यासदाैऱ्यास हिरवी झेंडी दाखविली. याप्रसंगी अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक तथा आत्माचे प्रकल्प संचालक संदीप कऱ्हाळे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता भामरागडचे उपविभागीय पाेलीस अधिकारी कुणाल सोनवणे, पाेलीस निरीक्षक रासकर, लाहेरीचे प्रभारी पाेलीस अधिकारी तथा पाेलीस उपनिरीक्षक नळेगावकर, धाेडराजचे प्रभारी पाेलीस अधिकारी घाडगे, ताडगावचे प्रभारी पाेलीस अधिकारी पिंगळे, पाेलीस उपनिरीक्षक प्रेमशहा सयाम, नारगुंडाचे प्रभारी पाेलीस अधिकारी चव्हाण, नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी महादेव शेलार, आदींनी सहकार्य केले.
जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये धान (भात) पिकासोबतच कडधान्य व इतर पिकांचे उत्पादन घेत असतात. परंतु, दुर्गम भागातील शेतकऱ्यांना अजूनही अत्याधुनिक प्रगत तंत्रज्ञान अवगत नसल्यामुळे भरघोस उत्पादन घेऊन दुर्गम, अतिदुर्गम भागातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या सधन होऊ शकलेला नाही. या बाबींचा विचार करून गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने अतिदुर्गम भागातील शेतकऱ्यांना शेतीच्या प्रगत तंत्रज्ञानाची माहिती व्हावी व त्यांचे जीवनमान उंचावून गडचिरोली जिल्ह्याच्या विकासात हातभार व्हावा या उद्देशाने कृषिदर्शन सहल व अभ्यासदाैरा काढण्यात आला.
दुसऱ्या सहलीमध्ये भामरागड तालुक्यातील नारगुंडा, धोडराज, लाहेरी, भामरागड, होडरी, गुंडेनूर, ताडगाव या अतिदुर्गम भागातील ४० शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवला आहे.
बाॅक्स...
एटापल्लीतील ४२ महिला शेतकऱ्यांनी घेतला लाभ
२ फेब्रुवारी राेजी एटापल्ली तालुक्यातील काेटमी व एटावाई या गावातील ४२ महिला शेतकऱ्यांची पहिली कृषी दर्शन सहल काढण्यात आली. या सहलीदरम्यान महिलांनी महाराष्ट्रातील विविध प्रगत कृषी विद्यापीठे तसेच इतर प्रगतशील ठिकाणांना भेटी देऊन शेतीचे प्रगत तंत्रज्ञान जाणून घेतले.
बाॅक्स...
या स्थळांना देणार भेटी
दुसऱ्या सहलीतील ४० शेतकरी विविध स्थळांना भेटी देणार आहेत. यामध्ये कृषी महाविद्यालय नागपूर, सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्च, नागपूर, कृषी विज्ञान केंद्र बडनेरा, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, आनंदसागर शेगाव, सिंदखेडराजा, औरंगाबाद, शिर्डी, म. फुले कृषी विद्यापीठ राहुरी, हिवरेबाजार, कृषी विज्ञान केंद्र बारामती, निमकर शेळीपालन फलटण, महाबळेश्वर येथील स्ट्रॉबेरी शेतींना भेटी देणार आहेत. तसेच प्रगतशील शेतकरी आबासाहेब शिंदे, ज्ञानेश्वर बोडके, रा. मोहोळ, जि. सोलापूर, अक्कलकोट, उस्मानाबाद, कृषी विद्यापीठ परभणी, आदी ठिकाणी भेटी देऊन माहिती जाणून घेणार आहेत.