गडचिरोली : जिल्हा मुख्यालय असलेल्या गडचिरोली शहराच्या विकासात्मक आराखड्याचे नियोजन करणाऱ्या स्थानिक नगर परिषद कार्यालयात गेल्या चार वर्षांपासून उपमुख्याधिकारीसह वर्ग १ ते ४ ची एकूण ३८ पदे रिक्त आहेत. यामुळे कार्यालयात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत आहे. परिणामी प्रशासकीय कामकाज संथगतीने होत असल्याचे दिसून येते. स्थानिक नगर परिषद कार्यालयात वर्ग २ ची उपमुख्याधिकारी, अभियंता व अग्नीशमन अधिकारी अशी तीन पदे रिक्त आहेत. वर्ग तीनचे एकूण ५३ पदे मंजूर आहेत. यापैकी २६ पदे कार्यरत आहेत. तर २७ पदे रिक्त आहेत. रिक्त असलेल्या या २७ पदांमध्ये राज्य संवर्गाचे बांधकाम विभाग अभियंता, विद्युत अभियंता, लेखा परीक्षक, लेखापाल, कनिष्ठ सहायक आदी पाच पदांचा समावेश आहे तर कनिष्ठ लिपीक १२, वाहनचालक, लघू टंकलेखक, उद्यान पर्यवेक्षक, स्वच्छता निरिक्षक, तारतंत्री, गाळणी चालक, ग्रंथपाल आदींचे प्रत्येकी एक व वरिष्ठ लिपीकांचे तीन पदे रिक्त आहेत. नगर परिषद कार्यायात वर्ग ४ ची एकूण ५२ पदे रिक्त आहेत. यापैकी ४५ कार्यरत असून ७ पदे गेल्या चार वर्षांपासून रिक्त आहेत. रिक्त असलेल्या वर्ग च्या पदांमध्ये व्हॉलमन १, फायरमन ३ व सफाई कामगार ३ या पदांचा समावेश आहे. स्थानिक नगर परिषद कार्यालयात बांधकाम, आरोग्य, पाणी पुरवठा, स्वच्छता विभाग, लेखा व आस्थापना विभाग तसेच गृह व पाणीपट्टी कर विभाग आहेत. रिक्त पदे असल्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत आहे. पुरेशा कर्मचाऱ्याअभावी नागरिकांना कार्यालयीन कामासाठी प्रतीक्षा करावी लागते. (स्थानिक प्रतिनिधी)
नगर परिषदेत ३८ पदे रिक्त
By admin | Updated: December 21, 2014 22:58 IST