चामोर्शी : चामोर्शी तालुक्यात एकमेव सिंचनाची सोय असलेल्या रेगडी येथील कर्मवीर कन्नमवार जलाशयात सिंचनासाठी पाणी खर्ची जाता सद्य:स्थितीत केवळ ३०.१७ टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्याची बाब उघडकीस आली आहे.गतवर्षी याच तारखेला कन्नमवार जलाशयात ८८.५३ टक्के म्हणजेच ६९.७९ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा शिल्लक होता. मात्र यावर्षी नियमित पाऊस पडत नसल्याने कन्नमवार जलाशयाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली नसल्याने यंदाच्या खरीप व रब्बी हंगामात शेतकऱ्यांसमोर सिंचनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर्षी रेगडी परिसरात २६ जून २०१४ ला घेतलेल्या नोंदीनुसार फक्त ६३१ मीमी पाऊस पडला आहे. गतवर्षी रेगडी जलाशय १०० टक्के भरला होता. त्यामुळे चामोर्शी तालुक्यातील २०१३-१४ या खरीप हंगामात १०८६७.२६ हेक्टर आर शेती क्षेत्रातील पीक सिंचनाखाली आले होते. गतवर्षी खरीप हंगामात कन्नमवार जलाशयातील ४२.५२१ दशलक्ष घनमीटर म्हणजेच ६२.९२ टक्के पाणी वापरण्यात आले होते. त्यामुळे खरीप हंगामात पाण्याचा वापर होऊन शिल्लक ४६.६९ टक्के जलसाठा उन्हाळी धानपिकासाठी वापरण्यात आला. या जलाशयाच्या माध्यमातून २१५.६८ हेक्टर आर क्षेत्र उन्हाळी धानपिकाच्या सिंचनाखाली आले. या जलसाठ्याचा आठ गावातील २०७ शेतकऱ्यांनी उन्हाळी धानपिकासाठी लाभ घेतला. या जलाशयात फक्त ३०.१७ टक्के जलसाठा शिल्लक असल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)
रेगडी जलाशयात ३० टक्के पाणीसाठा शिल्लक
By admin | Updated: June 28, 2014 00:47 IST