गडचिरोली : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेच्या वतीने १६ जानेवारी रोजी शनिवारला गडचिरोली जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभरात शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने या परीक्षेसाठी गडचिरोली जिल्ह्यात एकूण १९ केंद्रांची व्यवस्था केली आहे. या केंद्रांवरून पेपर एक व पेपर दोन मिळून एकूण ३ हजार ६२९ विद्यार्थी टीईटी परीक्षा देणार आहेत. सन २०१३ पासून राज्यभरात शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात येत आहे. पहिल्यांदा २०१३ च्या डिसेंबर महिन्यात टीईटी परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर २०१४ मध्ये दुसरी परीक्षा घेण्यात आली. आता होणारी ही तिसरी टीईटी परीक्षा आहे. शनिवारी गडचिरोली शहरातील १९ केंद्रांवरून एकूण ३ हजार ६२९ विद्यार्थी टीईटी परीक्षा देणार आहेत. इयत्ता पहिली ते पाचवीसाठी अध्यापण करणाऱ्या प्राथमिक शिक्षकांसाठी पेपर क्रमांक एक सकाळी १०.३० ते १ या वेळेत होणार आहे. तर इयत्ता सहावी ते आठवीला शिकवू इच्छिणाऱ्या माध्यमिक शिक्षकांसाठी दुपारी १.३० ते ४ या वेळेत पेपर क्रमांक दोन घेण्यात येणार आहे. पेपर क्रमांक एक साठी २ हजार १३८ विद्यार्थी असून याकरिता ११ केंद्र ठेवण्यात आले आहेत. पेपर क्रमांक दोनसाठी १ हजार ४९१ परीक्षार्थी असून याकरिता आठ केंद्र ठेवण्यात आले आहे. शहरात संत गाडगे महाराज विद्यालय, राणी दुर्गावती कन्या विद्यालय, वसंत विद्यालय, स्कूल आॅफ स्कॉलर, जिल्हा परिषद हायस्कूल, शिवाजी हायस्कूल गोकुलनगर, महिला महाविद्यालय, जिल्हा कॉम्प्लेक्स हायस्कूल व साईनाथ अध्यापक विद्यालय मुरखळा नवेगाव आदी केंद्रांचा समावेश आहे.
३ हजार ६२९ विद्यार्थी देणार टीईटी परीक्षा
By admin | Updated: January 16, 2016 01:56 IST