चार गंभीर : येडानूर-भटेगावदरम्यानची घटना लोकमत न्यूज नेटवर्क कुरखेडा : मांडव वाढणीचा कार्यक्रम आटोपून वऱ्हाडी घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरची ट्रॉॅली उलटल्याने २१ जण जखमी झाल्याची घटना कुरखेडा तालुक्यातील येडानूर-भटेगाव दरम्यान बुधवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. जखमी २१ मधील ४ जण गंभीर स्थितीत आहेत. यामध्ये शेलेंद्र कोवाची (११), सुलाईबाई हलामी (६५), जयतोबाई ताराम (६०), बिंजाबाई मराई (६०) सर्व रा. सूर्याडोंगरी ता. मोहल्ला जि. राजनांदगाव (छत्तीसगड) यांचा समावेश आहे. या अपघातातील गंभीर जखमी असलेल्या चौघांना गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहेत. उर्वरित १७ जखमींवर कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. येडानूर येथील संकेश सुखदेव कवडो यांचा विवाह छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव जिल्ह्याच्या सूर्याडोंगरी येथील मुलीशी २ मे रोजी आटोपला. आदिवासी समाजात लग्नानंतर मांडव वाढणीचा कार्यक्रम घेतला जातो. या कार्यक्रमासाठी वऱ्हाडी घेऊन ट्रॅक्टर येडानूर येथे परत जात असताना हा अपघात घडला. गडचिरोली जिल्ह्यात काही दिवसांपासून लग्न वऱ्हाड्यांच्या वाहनांना अपघात होत असल्याच्या घटना घडत आहेत.
वऱ्हाड्यांचा ट्रॅक्टर उलटल्याने २१ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2017 02:34 IST