गडचिरोली : चार दशकांहून अधिक काळ माओवादी चळवळीत राहून अनेक हिंसक कारवायांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविणारी जहाल महिला माओवादी व केंद्रीय समिती सदस्य पोथुला पद्मावती उर्फ सुजाताने (६२) तेलंगणा पोलिसांपुढे १३ सप्टेंबरला आत्मसमर्पण केले. वार्धक्यामुळे थकलेले शरीर व आजारपण यामुळे सैरभैर झालेल्या सुजाताच्या आत्मसमर्पणाचा निर्णय घेतला. यामुळे माओवाद्यांना मोठा धक्का बसला आहे. जहाल दिवंगत माओवादी नेता माल्लोजुला कोटेश्वर राव उर्फ किशनजी याची सुजाता ही पत्नी आहे.
मूळची तेलंगणातील पेंचकलपेठ (जि. जोगुलांबा गाडवाल) येथील रहिवासी असलेल्या सुजाताकडे सध्या नक्षल्यांच्या केंद्रीय समिती सदस्य, दक्षिण विभागाचे सचिवपद व दंडकारण्य विभागाच्या जनताना सरकारचा प्रभार होता. ४३ वर्षांपासून नक्षलसंघटनेत सक्रिय सहभागी असलेल्या सुजातावर विविध राज्यांत दोन कोटीहून अधिक इनाम होते. सुजाता व किशनजी हे १९८० च्या दशकात गडचिरोलीत सक्रिय होते. पुढे १९९७ ते ९९ दरम्यान तिला दक्षिण बस्तर विभागीय समिती सदस्य पदावर बढती देण्यात आली. त्यानंतर दंडकारण्य विभाग आणि दक्षिण बस्तरमध्ये तिला महत्त्वाची जबाबदारी सोपवली. २००७ मध्ये दंडकारण्य झोनच्या जनताना सरकारचे प्रमुख पद तिच्याकडे सोपविण्यात आले. किशनजीला २००८ साली पश्चिम बंगालची जबाबदारी दिल्यानंतर २०११ मध्ये तो चकमकीत ठार झाला. त्यानंतर सुजाता संघटनेत अधिकच आक्रमकपणे सक्रिय झाली. यामुळे तिला २०२२ साली केंद्रीय समितीवर घेण्यात आले. ती कोया भाषेतून निघणाऱ्या 'पेथुरी' मासिकाची संपादक देखील होती.
नक्षल हल्ल्यांमध्ये सक्रिय सहभाग
६३ राजकीय नेते व सामान्य नागरिकांसह २०७ जवानांच्या खुनाचा सुजातावर आरोप आहे. ताडमेटला, गादीरास, झिरम घाटी, चिंतागुफा, कोरजगुडा, टेकुलगुडे येथे नक्षल्यांनी केलेल्या मोठ्या हल्ल्यांत तिचा सक्रिय सहभाग होता. मधल्या काही काळापासून आजारी असल्यामुळे सुजाताने आत्मसमर्पणाचा निर्णय घेतल्याचे तेलंगणाचे पोलिस महासंचालक डॉ. जितेंद्र यांनी सांगितले. ४०४ नक्षलवाद्यांनी चालू वर्षी तेलंगणात आतापर्यंत आत्मसमर्पण केले आहे.
"सुजाताला आत्मसमर्पण योजनेंतर्गत २५ लाख देण्यात येणार आहेत. अजूनही वेळ गेलेली नाही. नक्षल्यांनी शस्त्रे टाकावीत व आत्मसमर्पण व पुनर्वसन योजनेचा लाभ घेऊन विकासाच्या मार्गावर यावे."- बंदी संजय कुमार, केंद्रीय गृहराज्यमंत्री