तीन महिन्यांत : रेतीचे अवैध उत्खनन व वाहतूक गडचिरोली : महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी १ एप्रिल ते ३० जून २०१६ या तीन महिन्यांच्या कालावधीत विविध ठिकाणी धाडसत्र राबवून रेती व इतर गौण खनिजाचे एकूण २२६ प्रकरणे निकाली काढले. या प्रकरणातून संबंधित कंत्राटदाराकडून एकूण १८ लाख ९३ हजार ५५० रूपयांचा दंड वसूल केला. गडचिरोली उपविभागातील गडचिरोली व धानोरा तालुक्यात महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ५९ प्रकरणातून ४ लाख ५८ हजार ७०० रूपयांचा दंड तीन महिन्यांच्या कालावधीत वसूल केला. चामोर्शी व मुलचेरा तालुक्याचा समावेश असलेल्या चामोर्शी उपविभागाने ४१ प्रकरणातून ६ लाख २२ हजार ८५० रूपयांचा दंड वसूल केला. देसाईगंज व आरमोरी तालुक्याचा समावेश असलेल्या देसाईगंज उपविभागाने ४८ प्रकरणातून ३ लाख ३५ हजार २०० तर कुरखेडा व कोरची तालुक्याचा समावेश असलेल्या कुरखेडा उपविभागात महसूल विभाच्या अधिकाऱ्यांनी १२ प्रकरणातून ७७ हजार २०० रूपयांचा दंड वसूल केला. अहेरी व सिरोंचा तालुक्याचा समावेश असलेल्या अहेरी उपविभागाने ५६ प्रकरणातून एकूण ३ लाख १८ हजार ६०० रूपयांचा दंड वसूल केला. एटापल्ली व भामरागड तालुक्याचा समावेश असलेल्या एटापल्ली उपविभागातील महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तीन महिन्यांच्या कालावधीत धाडसत्र राबवून एकूण १० प्रकरणातून ८१ हजार रूपयांचा दंड संबंधित कंत्राटदाराकडून वसूल केला. महसूल विभागाच्या या कारवाईमुळे जिल्हाभरातील रेती माफियांचे धाबे दणाणले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
१८ लाख ९३ हजारांचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2016 01:25 IST