बीआरओने केला होता रस्ता तयार : बांधकाम विभागाचे होत आहे दुर्लक्षभामरागड : बीआरओच्या वतीने तालुक्यातील कोठी मार्गाची निर्मिती २००० मध्ये करण्यात आली. तेव्हापासून या मार्गाची एकदाही डागडुजी करण्यात आली नाही. परिणामी या मार्गावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले असून याचा त्रास कोठी परिसरातील गावकऱ्यांना होत आहे. कोठी परिसरात मरकनार, तुमरकोडी, मुरमबुसी, तोयनार या गावांचा समावेश आहे. ही सर्वच गावे घनदाट जंगल व डोंगरांनी वेढले आहेत. या गावांना जाण्यासाठी अनेक लहान-मोठे नाले आहेत. पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण होते. कोठीला जाण्यासाठी दोन नाले पडत असून या नाल्यांवरील पूल कमी उंचीचा असल्याने पावसाळ्यात या पुलांवरून पाणी राहते. पर्लकोटा नदीला लागूनच हा रस्ता असल्याने पर्लकोर्टाला पूर आल्यानंतर सदर मार्ग बंद होतो व तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटतो. मार्गाच्या निर्मितीपासून या मार्गावर टोपलीभरही मुरूम किंवा डांबर टाकण्यात आले नाही. त्यामुळे प्रचंड प्रमाणात खड्डे पडले असून या खड्ड्यांचा त्रास या परिसरातील वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. अनेक पुलाजवळील रस्ते वाहून गेल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहेत. पावसाळ्यात बस ये-जा करण्यास अडचण निर्माण होते. पोलीस विभागाने गावकऱ्यांच्या मदतीने श्रमदान करून मार्गाची दुरूस्ती केली होती. (तालुका प्रतिनिधी)
१५ वर्षांपासून भामरागड-कोठी मार्गाची दुरूस्ती रखडली
By admin | Updated: December 14, 2015 01:45 IST