गडचिरोली : राज्य शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने गडचिरोली जिल्ह्यातील १५ गावांमध्ये पाणी पुरवठा योजना मंजूर केल्या असून त्यासाठी १० कोटी १० लाख ४४ हजार रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यामुळे या गावातील पाणी टंचाई कमी होण्यास मदत झाली आहे. प्रत्येक नागरिकाला पुरेसे व स्वच्छ पाणी मिळावे यासाठी राज्य व केंद्र शासनाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. त्याचबरोबर उन्हाळ्याच्या दिवसात निर्माण होणारी पाणी टंचाईची समस्या लक्षात घेऊन संबंधित गावाला पाणी पुरवठा योजना मंजूर करण्याचे धोरण शासनाने अवलंबिले आहे. पाणी पुरवठा योजना जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाच्या मार्फतीनेच मंजूर केल्या जातात. मात्र पाणी पुरवठा योजनेला येणाऱ्या खर्चाच्या तुलनेत गावाची लोकसंख्या कमी असेल तर अशा योजना शासनाकडे विशेष मंजुरीसाठी पाठविल्या जातात. उन्हाळ्यांमध्ये निर्माण होणारी पाणी टंचाई लक्षात घेऊन पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आल्या आहेत. यामध्ये गडचिरोली तालुक्यातील इंदाळा, मेंढा, आंबेटोला, भिकारमौशी, चामोर्शी तालुक्यातील घोट, मुलचेरा तालुक्यातील गोविंदपूर, खुदीरामपल्ली, धानोरा तालुक्यातील चिंगली, गोडलवाही, चातगाव, साखेरा, येरकड, सावरगाव, मोरचूल, दुधमाळ या गावांचा समावेश आहे. तात्विक मंजुरी देतानाच या योजनांसाठी निधीही मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे या योजना बांधकामाचा प्रश्न मार्गी लागला आहे. पाणी पुरवठा योजना मंजूर झाल्याने संबंधित गावांमध्येही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यात ज्या १५ योजना मंजूर झाल्या, यातील बहुतांश योजना धानोरा व गडचिरोली तालुक्यातील आहे. मात्र विकासाच्या दृष्टीने मागे पडलेल्या भामरागड, एटापल्ली, सिरोंचा, कोरची, कुरखेडा या भागातील अनेक गावांना आजही पिण्याचे शुध्द पाणी मिळत नाही. त्यांना गावाजवळच्या नदी, नाल्यांचे पाणी पिण्यासाठी वापरावे लागत आहे. अशा गावातील योजनांचा आराखडा तयार करून या भागात पाणी पुरवठा योजना नव्याने निर्माण करणे आवश्यक आहे, अशी मागणी या तालुक्यातील नागरिकांनी शासनाकडे केली आहे.(नगर प्रतिनिधी)योजनेसाठी मंजूर निधीगावनिधीमेंढा९१,४६,०३५इंदाळा७१,२३,६८२आंबेटोला४५,७९,८६०घोट२,००,६१,७४२गोविंदपूर५६,९५,३८६खुदीरामपल्ली६८,३१,१७४चिंगली६९,७५,०४४गोडलवाही६०,७०,१६०चातगाव८९,३७,७२०साखेरा७१,७३,३००येरकड७१,६९,६२१सावरगाव५५,०६,२९४दुधमाळा५७,७४,४६९एकूण१०,१०,४४,४८७
१५ गावांची होणार पाणी टंचाईतून मुक्ती
By admin | Updated: April 19, 2015 01:28 IST