गडचिरोली : राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा २२ मार्च रोजी रविवारला घेण्यात येणार आहे. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जिल्हाभरातून इयत्ता चौथी व सातवीचे मिळून १२ हजार ८३५ विद्यार्थी एकूण ८९ केंद्रांवरून परीक्षा देणार आहे. सदर परीक्षा निकोप व शिस्तीच्या वातावरणात पार पाडण्यासाठी शिक्षण विभाग सज्ज झाला आहे. जिल्ह्याती ४७ केंद्रावरून पूर्व माध्यमिक अर्थात चौथीचे सहा हजार ७७९ तर माध्यमिक अर्थात सातवीचे सहा हजार ५६ विद्यार्थी ४२ केंद्रावरून परीक्षा देणार आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. परीक्षेच्या नियोजनार्थ पूर्व माध्यमिक व माध्यमिक विभागाच्या पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षा सुरू असताना नियंत्रण ठेवण्यासाठी व परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रत्येक केंद्रावर केंद्र संचालक व केंद्र प्रमुखाचे बैठे पथक राहणार असून प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या भरारी पथकाची या परीक्षेवर नजर राहणार आहे. विद्यार्थ्यांची परीक्षा कालावधीत गैरसोय होणार नाही, याची काळजी घेत शिक्षण विभागाच्या वतीने प्रत्येक परीक्षा केंद्रावर सुविधा देण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
१२ हजार विद्यार्थी देणार परीक्षा
By admin | Updated: March 22, 2015 00:35 IST