२३ ला निवडणूक : ३ नोव्हेंबरपासून नामांकन अर्ज स्वीकृती प्रक्रियागडचिरोली : राज्य निवडणूक आयोगाने २७ आॅक्टोबर २०१४ रोजी पत्र काढून राज्यभरासह जिल्ह्यातील डिसेंबर २०१४ मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार गडचिरोली जिल्ह्यात धानोरा तालुक्यातील कोंदावाही या एकमेव ग्रामपंचायतीमध्ये सार्वत्रिक तर कुरखेडा तालुक्यातील १० ग्रामपंचायतीमध्ये पोटनिवडणूक २३ नोव्हेंबर २०१४ रोजी होणार आहे.जिल्ह्यात एकूण ४६७ ग्रामपंचायती आहेत. यापैकी ११ ग्रामपंचायती वगळून सर्व ग्रा. पं. ची मुदत एप्रिल २०१५ मध्ये संपणार आहे. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये सार्वत्रिक निवडणूक घेण्यात येणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने डिसेंबर २०१४ मध्ये मुदत संपणाऱ्या राज्यातील १४५ ग्रा. पं. च्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये गडचिरोली जिल्ह्यात धानोरा तालुक्यातील कोंदावाही या ग्रामपंचायतीमध्ये सार्वत्रिक निवडणूक व कुरखेडा तालुक्यातील पुराडा, शिवणी, दादापूर, तळेगाव, धनेगाव, आंधळी (सोनसरी), घाटी, कातलवाडा, रानवाही व खोब्रामेंढा आदी १० ग्रामपंचायतीमध्ये पोटनिवडणूक होणार आहे. सदर सार्वजनिक व पोटनिवडणूक २३ नोव्हेंबर २०१४ रोजी रविवारला सकाळी ७.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत होणार आहे. याच कालावधीत मतदानाची प्रक्रिया घेतली जाणार आहे.महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम या योजनेबाबतच्या शासन निर्णयामध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करणे या उपाययोजनेचा समावेश आहे. मात्र निवडणूक आयोगाच्या १२ नोव्हेंबर २००७ च्या आदेशानुसार ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम योजनेच्या बैठकीमध्ये जिल्हास्तरावरील अथवा उपविभागीय स्तरावरील तसेच तालुकास्तरावरील कोणत्याही शासकीय अधिकाऱ्यांनी भाग घेतल्यास तो निवडणूक आचारसंहितेचा भंग मानण्यात येईल व त्यांच्या विरूद्ध उचित कार्यवाही करण्यात येईल, असे २७ आॅक्टोबर २०१४ च्या निवडणूक आयोगाच्या पत्रामध्ये नमूद आहे. ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकीसाठी संबंधीत प्रभागाच्या क्षेत्रात निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्याच्या दिनांकापासून म्हणजे २७ नोव्हेंबरपासून आचारसंहिता लागू झाली आहे. सदर आचारसंहिता निकाल जाहीर होईपर्यंत लागू राहील. (स्थानिक प्रतिनिधी)
११ ग्रा. पं. मध्ये होणार निवडणूक
By admin | Updated: October 28, 2014 22:55 IST