लंडन - रशियात नुकत्याच पार पडलेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेनंतर सर्वांना वेध लागलेत ते 2022च्या स्पर्धेचे, परंतु यजमानपदाच्या निवडीपासूनच ही विश्वचषक स्पर्धा वादात राहिली आहे. त्यात यजमानपद मिळवण्यासाठी कतारने पेड बातम्या दिल्याचे प्रकरण समोर येत आहे. या स्पर्धेच्या आयोजनासाठी कतारसह अमेरिका, दक्षिण कोरिया, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांनीही उत्सुकता दर्शवली होती. मात्र खरी चुरस रंगली ती कतार आणि अमेरिका यांच्यात, त्यात कतारने 14-8 अशा फरकाने बाजी मारली.
कतारला यजमानपद मिळाल्यापासून 2022ची स्पर्धा चर्चेत आहेच. यजमानपदाच्या मतासाठी लाच दिल्याच्या आरोपापासून ते कतारच्या हवामानात खेळाडूंना होणा-या त्रासापर्यंतच्या मुद्यांवरून या निर्णयाला विरोध झाला. त्यात हे यजमानपद मिळवण्यासाठी कतारकडून फिफाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. यजमानपदाच्या शर्यतीत असलेल्या अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या दावेदारांबद्दल पैसे देऊन अपप्रचार केल्याचा आरोप कतारवर ठेवण्यात आला आहे. यासाठी कतारने जवळपास 7000 पाऊंड रक्कम खर्ची केल्याचा दावा करण्यात येत आहे.
त्यामुळे फिफाच्या नियमांचे उल्लंघन झाले असून त्याची चौकशी सुरू आहे. यात कतार दोषी आढळल्यात त्यांच्याकडून यजमानपदाचा मान काढून घेतला जाऊ शकतो. 2022च्या विश्वचषक आयोजनासाठी इंग्लंडने तयारी दर्शवली आहे. त्यांनी 2018च्या स्पर्धेसाठी अर्ज दाखल केला होता, परंतु तो मान रशियाला मिळाला. इंग्लंड फुटबॉल असोसिएशनचे माजी अध्यक्ष लॉर्ड ट्राइस्मन यांनी 2022च्या विश्वचषक स्पर्धा आयोजनाची तयारी दर्शवली आहे.