- रोहित नाईकमुंबई : सचिन तेंडुलकर आणि लिओनेल मेस्सी हे दोन्ही दिग्गज आपापल्या खेळामध्ये श्रेष्ठं, यात वाद नाही. सचिनने आपल्या तंत्रशुद्ध फलंदाजीने संपूर्ण क्रिकेटविश्वावर भुरळ टाकली, तर दुसरीकडे सुपरस्टार मेस्सीने आपल्या अप्रतिम पददालित्यने सा-या फुटबॉलविश्वास स्तब्ध केले. हे दोन्ही लिजंड खेळाडू क्रीडाप्रेमींसाठी देव असल्याचे म्हटले तरी वावगे ठरणार नाही, अशी यांची कामगिरी. ज्याप्रमाणे भारताला आपल्या क्रिकेटविश्वविजेतेपदासाठी कायम सचिनवर अवलंबून रहावे लागत होते, त्याप्रमाणेच गेल्या दोन वर्षांपासून अर्जेटिनाच्या जगज्जेतेपदाच्या आशा मेस्सीवर अवलंबून आहेत. सचिनने आपल्या देशाची इच्छा पूर्ण केली २०११ साली आपल्या कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यावर, तर आता मेस्सीलाही नेमकी अशीच संधी चालून आली आहे. त्यामुळेच मेस्सी फुटबॉलचा सचिन तेंडुलकर ठरणार का? असा प्रश्न उपस्थित केला आहे कोलकाताच्या ‘अर्जेंटिना फॅन क्लब’ने. जगभरात अर्जेंटिनाचे आणि मेस्सीचे चाहते पसरले आहेत. भारतात फुटबॉलची सर्वाधिक क्रेझ असलेल्या कोलकातामध्येही अर्जेटिना व मेस्सी चाहत्यांची कमी नाही. या सर्वांची पूर्ण खात्री आहे की, सध्या आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यावर असलेला मेस्सी तेंडुलकरप्रमाणेच देशाला विश्वविजयी करण्यास त्वेषाने खेळेल. क्रिकेटच्या मैदानावर जवळपास सर्वच विक्रमांना गवसणी घातलेल्या सचिनला कायम जगज्जेतेपदाने हुलकावणी दिली. २००३ साली सचिनला विश्वविजेतेपद उंचावण्याची संधी मिळालीही होती, पण अंतिम आॅस्टेÑलियाच्या तुफानी खेळीपुढे ते स्वप्न अखेर अधुरेच राहिले. मात्र, कारकिर्दीतील अखेरचा विश्वचषक आणि तोही मायदेशात खेळताना सचिनने भारताच्या विश्वविजेतेपदात मोलाचे योगदान दिले आणि खºया तेव्हा कुठे सचिनला आपल्या कामगिरीचे सार्थक झाल्याचे वाटले. अगदी अशीच संधी यंदा मेस्सीला मिळाली आहे. २०१४ साली झालेल्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत मेस्सीने आपल्या जादुई कामगिरीच्या जोरावर अर्जेंटिनाला अंतिम फेरीत नेले. मात्र, मोक्याच्यावेळी झालेली चूक महागात पडल्याने त्यांना जर्मनीविरुद्ध निसटात पराभव पत्करावा लागला आणि मेस्सीच्या हातून विश्वचषकही निघून गेला. यानंतर मोठ्या टिकेला सामोरे जावे लागल्याने मेस्सीने आंतरराष्ट्रीय स्पर्धांतून निवृत्तीही घेतली. मात्र, देशवासीयांच्या प्रेमाखातर त्याने पुनरागमन केले आणि आता त्याने कोणत्याही परिस्थितीमध्ये देशाला जगज्जेतेपद मिळवून देण्याचा निर्धार केला आहे. क्लब फुटबॉलमध्ये बार्सिलोना एफसीला जवळपास सर्व जेतेपद पटकावून दिलेल्या मेस्सीला देशासाठी विश्वविजेतेपद पटकावता आलेले नाही. त्यामुळेच यंदा अर्जेंटिनाच्या सर्व आशा मेस्सी मॅजिकवर लागल्या आहेत. शिवाय मेस्सी आता ३० वर्षांचा असल्याने यंदाचा विश्वचषक त्याच्या कारकिर्दीतील अखेरचा मानला जात आहे. अशा परिस्थितीमध्ये तो सचिनप्रमाणेच आपल्या अखेरच्या स्पर्धेत आपल्या देशाला जगज्जेता करु शकतो असा विश्वास ‘अर्जेंटिना फॅन क्लब’चे सचिव उत्तम साहा यांनी व्यक्त केला आहे. अर्जेंटिनाचे कट्टर चाहते असलेल्या उत्तम साहा यांनी १९७८ साली देखील अर्जेंटिना समर्थकांची ‘अमरा’ नावाची एक टीम बनवली आहे. त्यावेळी दिएगो मॅरेडोनाच्या जादुई खेळाच्या जोरावर अर्जेंटिनाने विश्वविजेतेपद पटकावले होते. यंदा मेस्सीदेखील याच प्रकारचा जादुई खेळ करत अर्जेंटिनासाठी विश्वविजेतेपद पटकावले असा ठाम विश्वास साहा यांना आहे.
मेस्सी फुटबॉलचा ‘सचिन तेंडुलकर’ ठरणार का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2018 07:32 IST