Euro 2020 स्पर्धेच्या फायनलमध्ये इंग्लंड विरुद्ध इटली हे दोन संघ भिडणार आहेत. इंग्लंडनं बुधवारी डेन्मार्कचा २-१ असा पराभव करून फायनलमध्ये प्रवेश केला. ५५ वर्षांत प्रथमच इंग्लंड मोठ्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्यात यशस्वी ठरला. अतिरिक्त वेळेच्या १०४व्या मिनिटाला इंग्लंडचा कर्णधार हेरी केन यानं केलेला गोल निर्णायक ठरला. १०४व्या मिनिटाला इंग्लंडला पेनल्टी किक मिळाली होती तेव्हा प्रेक्षकांमधून डेन्मार्कचा गोलरक्षक कॅस्पर शेमेईचेल ( Kasper Schmeichel) याच्या डोळ्यावर लेझर लाईट मारण्यात आली होती. पण, त्याचा फारसा काही उपयोग झाला नाही कॅस्परनं तो चेंडू अडवला, पण रिबाऊंडमध्ये केनला गोल करण्यात यश आलं. १९६६च्या वर्ल्ड कप फायनलनंतर इंग्लंडनं मोठ्या स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश मिळवला.
इंग्लंडच्या या विजयाचा जल्लोष रात्रभर चालला. रस्त्यांवर लाखोंच्या संख्येनं फॅन्स जल्लोष करत होते.. या आनंदाची झिंग सकाळपर्यंत उतरलीच नाही.. पण, इंग्लंडचा हा सामना स्टेडियमवर जाऊन पाहणे एका ३७ वर्षीय महिलेला महागात पडला. डिजिट कंटेंट प्रोडूसर असलेल्या निना फारूकी ही इंग्लंडचा कर्णधार हेरी केननं विजयी गोलनंतर स्टेडियमवर जल्लोष करताना टिव्हीवर दिसली. तिचा हा आनंद कॅमेरामननं लाईव्ह दाखवला अन् त्यानंतर तिला दुसऱ्या दिवशी मोठा धक्का बसला.
निनाच्या या आनंदावर २४ तासांत विरझण पडले. सकाळी तिच्या बॉसचा फोन खणखणला अन् तिला कामावरून काढून टाकण्यात आल्याचं त्यानं सांगितलं. निनाच्या मैत्रीणीला अखेरच्या मिनिटाला तिकीटं मिळाली आणि त्यामुळे सामना पाहण्यासाठी निनाला ऑफीसमध्ये खोटं बोलावं लागलं. पण, स्टेडियमवरील तिची उपस्थिती कॅमेरामननं टिपली अन् ती टिव्हीवर झळकली. तिला टिव्हीवर पाहताच बॉसचा पारा चढला अन् त्यानं तिला कामावरून काढून टाकले.
दी टेलेग्राफशी बोलताना निनानं सांगितलं की,''आता संमिश्र भावना आहेत. इंग्लंडचा संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे आणि याचा आनंद आहेच, परंतु दुसऱ्या बाजूला मला नोकरी गमवावी लागली आहे. माझ्या मैत्रिणीला अखेरच्या क्षणाला ऑफिसमधून सामन्याचे तिकीटं जिंकली आणि फुटबॉल सामना पाहण्यासाठी मी काही करू शकते, हे तिलाही माहीत होते. १९९६ सालचा पराभव मला आजही चांगला लक्षात आहे. जेव्हा गॅरेथ साऊथगेट यांनी पेनल्टी किक मिस केली होती आणि इंग्लंडचा पराभव झाला होता. मी तेव्हा आईच्या कुशीत ढसाढसा रडले होते. फुटबॉल हे माझं आयुष्य आहे.''