Fifa World Cup, Messi Argentina : संकटमोचक लिओनेल मेस्सी! अर्जेंटिनाचे आव्हान वाचवताना मॅरेडोनाच्या विक्रमाशी बरोबरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2022 07:35 IST
मेक्सिकोविरुद्ध अर्जेंटिनाचा संघ यापूर्वी पराभूत झाला नव्हता, परंतु पहिल्या हाफमध्ये त्यांनी अर्जेंटिनाला दिलेली टक्कर पाहून चाहत्यांच्या मनात धाकधुक होती.
Fifa World Cup, Messi Argentina : संकटमोचक लिओनेल मेस्सी! अर्जेंटिनाचे आव्हान वाचवताना मॅरेडोनाच्या विक्रमाशी बरोबरी
Fifa World Cup, Lionel Messi Argentina : फिफा फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेत अर्जेंटिनाने आव्हान कायम राखले. पहिल्याच सामन्यात सौदी अरेबियाकडून धक्कादायक पराभव पत्करल्यानंतर आजच्या सामन्य़ाकडे साऱ्यांचेच लक्ष होते. मेक्सिकोविरुद्धअर्जेंटिनाचा संघ यापूर्वी पराभूत झाला नव्हता, परंतु पहिल्या हाफमध्ये त्यांनी अर्जेंटिनाला दिलेली टक्कर पाहून चाहत्यांच्या मनात धाकधुक होती. मात्र, लिओनेल मेस्सी संकटमोचक ठरला.. त्याने दुसऱ्या हाफमध्ये अप्रतिम गोल केलाच, शिवाय दुसऱ्या गोलसाठी सहाय्य करून प्लेअर ऑफ दी मॅच ठरला. अर्जेंटिनाने २-० अशा फरकाने मेक्सिकोवर विजय मिळवला.
अरेबियाकडून झालेल्या पराभवानंतर अर्जेंटिनावर दडपण होते आणि ते जाणवलेही. पहिल्या हाफमध्ये मेक्सिकोने त्याचाच फायदा उचलण्याचा प्रयत्न केला आणि उल्लेखनीय खेळ करताना दोन वेळच्या विजेत्यांना कडवी झुंज देण्यास भाग पाडले. पण, मेस्सीने दुसऱ्या हाफमध्ये कमाल केली आणि अर्जेंटिनाच्या खेळाडूंचा आत्मविश्वास परत मिळवला. अर्जेंटिनाने २००४नंतर मेक्सिकोविरुद्धची ११ सामन्यांत ( ८ विजय व ३ अनिर्णित) अपराजित मालिका कायम राखली. वर्ल्ड कप स्पर्धेतील मेक्सिकोचा हा अर्जेंटिनाविरुद्धचा चौथा पराभव ठरला. अर्जेंटिनाने नायजेरियाला सर्वाधिक ५ वेळा पराभूत केले आहे.
६४व्या मिनिटाला मेस्सीने पहिला गोल करून दिग्गज दिएगो मॅरेडोना यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. वर्ल्ड कप स्पर्धेतील मेस्सीचा हा आठवा गोल ठरला, मॅरेडोना यांनीही वर्ल्ड कपमध्ये ८ गोल केले आहेत. आता केवळ गॅब्रिएल बॅटीस्टुटा ( १०) हे अर्जेंटिनाकडून सर्वाधिक गोल करणारे खेळाडू आहेत. ८७ व्या मिनिटाला मेस्सीच्या मदतीने एंझो फर्नांडेसने गोल करून अर्जेंटिनाची आघाडी २-० अशी भक्कम केली. २१ वर्ष व ३१३ दिवसांचा फर्नांडेस हा अर्जेंटिनाकडून वर्ल्ड कप सपर्धेत गोल करणारा मेस्सीनंतर ( २००६ साली, १८ वर्ष व ३५७ दिवस ) युवा खेळाडू ठरला आहे.
अर्जेंटिनाने वर्ल्ड कप स्पर्धेतील सात सामन्यांत प्रथमच क्लीन शीट ठेवली आहे. यापूर्वी २०१४ मध्ये त्यांनी नेदरलँड्सविरुद्ध गोलशून्य बरोबरी ठेवली होती. अर्जेंटिनासाठी मेस्सीने सलग सहाव्या सामन्यात गोल केला आहे. आंतरराष्ट्रीय फुटबॉल मध्ये ( ६ नोव्हेंबर २०११ ते सप्टेंबर २०१२) त्याने दुसऱ्यांदा अशी कामगिरी केली आहे. C गटात पोलंड ४ गुणांसह अव्वल स्थानी आहे, तर अर्जेंटिना व सौदी अरेबिया यांच्या खात्यात प्रत्येकी ३ गुण आहेत. मात्र, गोल फरकामुळे अर्जेंटिनाची बाजू वरचढ आहे. सौदी अरेबियाला काल पोलंडने २-० असे पराभूत केले होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"