सारांस्क - इराण फुटबॉल संघासाठी त्याने जिवाचे रान केले... संघाच्या विश्वचषक पात्रता फेरीत सर्वाधिक गोल त्याच्या नावावर होते... पण फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील आव्हान साखळीत संपुष्टात आल्यानंतर असे काहीतरी घडले की त्याने निवृत्ती स्वीकारली.. अन् तिही वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी... सरदार अझमौन असे या खेऴाडूचे नाव आहे. ब गटात स्पेन आणि पोर्तुगाल हे बलाढ्य प्रतिस्पर्धी असतानाही इराणने अखेरच्या क्षणापर्यंत बाद फेरीच्या आशा कायम राखल्या होत्या. मोरोक्कोविरूध्दच्या विजयाने इराणने विश्वचषक स्पर्धेत विजयी सलामी दिली. पण दुर्दैवाने त्यांना साखळीतच गाशा गुंडाळावा लागला.त्यांच्या या कामगिरीनंतही देशातही त्यांचे कौतुक झाले. पण काही टवाळ फुटबॉल चाहत्यांनी खेळाडूंची टिंगल उडवली. ती टिंगल इतकी जहरी होती की अझमौनच्या आईची सुधारत असलेली प्रकृती पुन्हा बिघडली... म्हणून त्याला संघ आणि आई यापैकी एकाची निवड करावी लागली.
" माझी आई गंभीर आजाराशी झगडत होती. पण तिच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत होती. त्यामुळे मी आनंदात होतो. मात्र, दुर्दैवाने काही लोकांनी आमच्यावर वाचाळ टीका केली आणि ती सहन झाल्यामुळे आईची प्रकृती पुन्हा बिघडली, " असे अझमौन म्हणाला.'' त्यामुळे मला आई आणि संघ यापैकी एकाची निवड करावी लागली. मी आईची निवड केली,'' असेही अझमौनने स्पष्ट केले.