भारतातील या सहा मंदिरात मिळतो चवदार आणि पौष्टिक प्रसाद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 06:42 PM2017-11-30T18:42:09+5:302017-11-30T18:50:01+5:30

भारतीय मंदिरांमधील नैवेद्य तसेच भाविकांना वाटण्यात येणारा प्रसाद हा देखील चवदार, स्वादिष्ट आणि पौष्टिकतेनं संपन्न असतो. ब-याच मंदिरांमध्ये दररोज लाखो भाविकांना भोजनालयाच्या माध्यमातून हा प्रसाद वाटप केला जातो. या प्रसादांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्या-त्या प्रांताची खास चव या प्रसादाला असते.

6 Temples in India are known for their tasty prasad | भारतातील या सहा मंदिरात मिळतो चवदार आणि पौष्टिक प्रसाद!

भारतातील या सहा मंदिरात मिळतो चवदार आणि पौष्टिक प्रसाद!

Next
ठळक मुद्दे* कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे म्हणजे महाराष्ट्रातील गणरायाच्या जागृत देवस्थानांपैकी एक. येथे गणपतीबाप्पासाठी अत्यंत सात्विक नैवेद्य दाखवला जातो. तो म्हणजे खिचडी, पापड, लोणचे आणि गोड बुंदी.* भारतातील सर्वात मोठ्या प्रसादालयांपैकी एक म्हणून अमृतसरमधील सुवर्णमंदिर ओळखलं जातं. पंजाबी पद्धतीचं जेवण या लंगरमध्ये तयार केलं जातं.डाळ, पंजाबी रोटी, भाजी, शिरा, लापशी हे लंगरमधील प्रमुख पदार्थ आहेत.* अक्षय पात्र या संकल्पनेवर या आधारित कर्नाटकातील इस्कॉन मंदिराचे प्रसादालय आहे. कर्नाटकातील हुबळी येथील या भोजनालयाचं वैशिष्ट्य म्हणजे दीड लाख भाविकांसाठीचं भोजन येथे केवळ पाच तासात तयार होतं.

 



- सारिका पूरकर -गुजराथी


भारत हा उत्सव, श्रद्धा यांचा मिलाफ असलेला देश आहे. जितकी विविधता भाषा, पोशाख तितकीच विविधता श्रद्धास्थानांमध्येही आढळते. विविध जाती-जमातीच्या नागरिकांची श्रद्धास्थानं भारतभर विखुरलेली आहेत. या प्रत्येकाच्या प्रथा-परंपराही खूप भिन्न आहेत. श्रद्धा , भक्तीभावही अपार. तर अशा या श्रद्धास्थानांची प्रतीकं म्हणजेच भारतातील विविध देव-देवतांची मंदिरं. अतिप्राचीन, मध्यमयुगीन आणि समकालीन मंदिरांचा हा देश. षोडपचारे पूजन, अभिषेक, आरती यानंतर वेळ येते ती नैवेद्याची. भारतीय मंदिरांमधील नैवेद्य तसेच भाविकांना वाटण्यात येणारा प्रसाद हा देखील चवदार, स्वादिष्ट आणि पौष्टिकतेनं संपन्न असतो. ब-याच मंदिरांमध्ये दररोज लाखो भाविकांना भोजनालयाच्या माध्यमातून हा प्रसाद वाटप केला जातो. या प्रसादांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्या-त्या प्रांताची खास चव या प्रसादाला असते, म्हणूनच प्रसादाच्या पदार्थांमध्ये भरपूर विविधता आढळते.

1) गणपतीपुळे ( महाराष्ट्र )
अवघ्या महाराष्ट्राचं पूज्य, लाडकं दैवत म्हणजे गणपती बाप्पा. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे म्हणजे महाराष्ट्रातील गणरायाच्या जागृत देवस्थानांपैकी एक. येथे गणपतीबाप्पासाठी अत्यंत सात्विक नैवेद्य दाखवला जातो. तो म्हणजे खिचडी, पापड, लोणचे आणि गोड बुंदी. सायंकाळच्या नैवेद्यासाठी मात्र मसालेभात केला जातो. परिपूर्ण जेवण आणि हलका आहार याचा हा मेळ आहे. कोकणात तांदूळ मुबलक प्रमाणात पिकतो, म्हणूनच नैवेद्यासाठी तांदळाचा वापर येथे अधिक प्रमाणात करण्यात येतो.
महाराष्ट्रातीलच शिर्डी आणि शेगाव येथेही मोठ्या प्रमाणात महाप्रसाद वाटप केले जाते. वरण-भात, उसळ, पोळी, चटणी-लोणचे असंपरिपूर्ण जेवण येथे महाप्रसाद म्हणून दिलं जातं. तसेच प्रसादाचे लाडूही येथे उपलब्ध असतात. शिर्डीत तर सौर उर्जेवर लाखो भाविकांचा स्वयंपाक शिजवला जातो. त्यासाठी 73 सोलर पॅनल्स बसविण्यात आले आहेत.

 


 

2) सुवर्णमंदिर (अमृतसर )
भारतभरात या मंदिरातील प्रसादाची चव लोकिप्रय आहे. या प्रसादास लंगर म्हणतात. लंगरचा प्रसाद भाविक जमिनीवर एका रांगेत बसून सेवन करतात. भारतातील सर्वात मोठ्या प्रसादालयांपैकी एक म्हणून या प्रसादालयाची नोंद आहे. पंजाबी पद्धतीचं जेवण या लंगरमध्ये तयार केलं जातं.डाळ, पंजाबी रोटी, भाजी, शिरा, लापशी हे लंगरमधील प्रमुख पदार्थ आहेत. सर्व पदार्थ हे शाकाहरी असून गोड पदार्थ आजही शुद्ध तूपातच बनवले जातात. या प्रसादालयात दररोज सुमारे 2 लाख रोटी, 1.5 टन डाळ केली जाते. 25 क्विंटल भाज्या येथे दररोज वापरल्या जातात. तसेच गोड पदार्थांसाठी 10 क्विंटल साखर, 5 क्विंटल शुद्ध तूप, 5000 लिटर दूध वापरलं जातं.

3) जगन्नाथ पुरी (ओरिसा)

भगवान जगन्नाथ यांच्या प्रसादास येथे महाप्रसाद म्हणून संबोधतात. प्रसादासाठी एकूण 56 प्रकारचे पदार्थ केले जातात. या प्रसादाच्या पदार्थांचं वैशिष्ट्य म्हणजे हे सर्व पदार्थ पारंपरिक पद्धतीनं मातीच्या भांड्यांमध्येच तयार केले जातात. गज्जा, खीरा (पनीर रबडी ), कनिका ( गोड भात ), अभोदा ( डाळ-भात-भाजी ) हे या महाप्रसादासाठी केले जाणारे काही प्रमुख पदार्थ आहेत.

 

4) तिरुपती बालाजी ( आंध्रप्रदेश)

भारतवासियांच्या श्रद्धास्थानांपैकी एक महत्वाचं आणि सर्वात श्रीमंत मंदिरापैकी एक. दररोज लाखो भाविक देशाच्या कानाकोप-यातून येथे येतात. या भाविकांसाठी देवस्थान मोफत प्रसाद वाटप करते. येथील प्रसादाचे लाडू तर खूपच लोकप्रिय आहेत. परंतु, त्याचबरोबर दद्दोजनम ( दहीभात ), पुलिगारे ( चिंचेचा भात ), मेदू वडा, चक्र पोंगल ( गोड भात ), अप्पम, पायसम ( खीर), जिलबी, मुरक्कू ( चकली ), सीरा ( केशरी हलवा ), डोसई ( डोसा ), मल्होरा या पदार्थांचा समावेश प्रसादाच्या पदार्थांमध्ये होतो.

5) वैष्णो देवी ( जम्मू)

नवसाला पावणारी माता वैष्णोदेवी अशी ख्याती असलेल्या या मंदिरात वर्षभर लाखो भाविकांची ये-जा असते. या मंदिरात देखील प्रसाद स्वरूपात भाविकांना पोटभर अन्न देण्याची प्रथा आजही सुरु आहे. राजमा-चावल, कढी-चावल, चना-पुरी असे मोजके परंतु पौष्टिक पदार्थ येथे प्रसादालयात दिले जातात.
 

6) इस्कॉन मंदिर ( कर्नाटक)

अक्षय पात्र या संकल्पनेवर या आधारित या मंदिराचे हे प्रसादालय किंवा भोजनालय आहे. कर्नाटकातील हुबळी येथील या भोजनालयाचं वैशिष्ट्य म्हणजे दीड लाख भाविकांसाठीचं भोजन येथे केवळ पाच तासात तयार होतं. तसेच या भोजनालयाच्या वतीने ग्रामीण भागातील मुलांना मध्यान्ह भोजन म्हणून खिचडी मोफत दिली जाते. ही सुविधा पुरवणारी जगातील सर्वात मोठी यंत्रणा म्हणून या संस्थेची नोंद आहे. भारतातील 12 राज्यांमधील 13,839 शाळांमधील 1.6 दक्षलक्ष मुलांपर्यंत खिचडीच्या रु पातील हे मध्यान्ह भोजन ही यंत्रणा पोहोचवते.

 

 

Web Title: 6 Temples in India are known for their tasty prasad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.