कोणी 'सफरचंद' तर कोणी 'खलनायिका' म्हणून हिणवले; आज मेहनतीच्या जोरावर टीव्ही इंडस्ट्री गाजवतेय
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 11:53 IST2026-05-12T11:52:08+5:302026-05-12T11:53:12+5:30
बिग बॉसचा शो जिंकणाऱ्या आणि सध्या टीव्ही इंडस्ट्री गाजवणाऱ्या अभिनेत्रीने तिच्या स्ट्रगलच्या काळाबद्दल धक्कादायक विधान केलंय.

कोणी 'सफरचंद' तर कोणी 'खलनायिका' म्हणून हिणवले; आज मेहनतीच्या जोरावर टीव्ही इंडस्ट्री गाजवतेय
टीव्ही अभिनेत्री रुबीना दिलैक सध्या तिच्या आगामी 'खतरों के खिलाडी' या शोमुळे चर्चेत आहे. आई झाल्यानंतर रुबीना आता पुन्हा एकदा कामावर परतत असून, यावेळी ती स्वतःच्या मनात असलेल्या भीतीवर विजय मिळवण्यासाठी आणि नवीन आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज झाली आहे.
आई झाल्यानंतरची आव्हाने
एका मुलाखतीत रुबीना म्हणाली की, आई झाल्यानंतर तिचे आयुष्य पूर्णपणे बदलले आहे. कामावर परतताना तिला नेहमी आपल्या मुलींची काळजी वाटते. डिलिव्हरीनंतर तिची शारीरिक ताकद आणि स्टॅमिना पूर्वीसारखा राहिला नसल्याने, 'खतरों के खिलाडी' सारख्या स्टंट्सवर आधारित शोमध्ये भाग घेणे तिच्यासाठी मोठे आव्हान असणार आहे.
सुरुवातीच्या काळातील संघर्ष आणि टोमणे
रुबीनाने आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांतील कटू अनुभव शेअर केले. तिने खूप कमी वयात या क्षेत्रात पाऊल ठेवले होते. स्ट्रगलच्या काळात लोक तिला 'हिमाचली सफरचंद' म्हणून हिणवायचे. या गोष्टींमुळे तिचा स्वतःवरील विश्वास कमी झाला होता आणि स्वतःच्या दिसण्याबाबत तिच्या मनात न्यूनगंड निर्माण झाला.
याशिवाय रुबीनाने एका धक्कादायक प्रसंगाची आठवण करून दिली. एकदा एका दिग्दर्शकाने तिचा चेहरा पाहताच तिला रिजेक्ट केले होते. तो दिग्दर्शक म्हणाला होता की, "तुझ्या चेहऱ्यावर खूप नकारात्मकता जाणवते. तुला कोणीही हिरोईन बनवणार नाही, तुला फक्त खलनायिकेच्याच भूमिका मिळतील." अशा टोमण्यांमुळे तिचे मानसिक खच्चीकरण झाले होते, मात्र तिने जिद्दीने इंंडस्ट्रीत आपली जागा निर्माण केली.
शोमधील सर्वात महागडी स्पर्धक
रुबीना दिलैकने 'बिग बॉस १४'चे विजेतेपद पटकावले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रुबीना आणि 'सेलिब्रिटी मास्टर शेफ'चा विजेता गौरव खन्ना हे यावर्षीच्या 'खतरों के खिलाडी' मधील सर्वाधिक मानधन घेणारे (Highest Paid) स्पर्धक आहेत. या दोघांच्या लोकप्रियतेमुळे निर्मात्यांनी त्यांना मोठी रक्कम देऊ केली आहे. प्रेक्षकांनाही तिला पुन्हा एकदा अॅक्शन मोडमध्ये पाहण्याची उत्सुकता आहे.