...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 07:03 IST2026-05-02T07:02:56+5:302026-05-02T07:03:22+5:30
उच्च न्यायालयाचे निरीक्षण, न्या.अमित बोरकर यांनी शेखर सुमन आणि भारती सिंह यांनी दाखल केलेल्या याचिका मंजूर करत गुन्हा रद्द केला.

...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
मुंबई : अभिनेते शेखर सुमन आणि भारती सिंह यांच्याविरुद्ध २०१० मध्ये दाखल करण्यात आलेला गुन्हा उच्च न्यायालयाने रद्द केला. एका कॉमेडी शोमध्ये आक्षेपार्ह शब्द उच्चारले गेले होते. त्यामुळे गुन्हा दाखल केला होता.
विनोदी कार्यक्रमात अन्नपदार्थांचा उल्लेख केल्याने तो धर्माचा अपमान ठरत नाही, असे न्यायालयाने म्हटले. हा गुन्हा रजा अकादमीच्या प्रतिनिधीने दिलेल्या तक्रारीवरून नोंदविला होता. ही तक्रार नोव्हेंबर २०१० मध्ये प्रसारित झालेल्या एका विनोदी कार्यक्रमाशी संबंधित होती. न्या.अमित बोरकर यांनी शेखर सुमन आणि भारती सिंह यांनी दाखल केलेल्या याचिका मंजूर करत गुन्हा रद्द केला.
उच्च न्यायालयाचे निरीक्षण काय?
न्यायालयाने असेही म्हटले की, कॉमेडी शोचे मूल्यमापन धार्मिक किंवा राजकीय भाषणाच्या निकषांवर करता येत नाही. अशा प्रकारच्या सादरीकरणाचा एकत्रितपणे विचार केला पाहिजे, वेगवेगळे शब्द वेगळे करून पाहता येत नाहीत. दोन्ही घटक आवश्यक आहेत. त्यापैकी एक जरी अनुपस्थित असेल, तर गुन्हा सिद्ध होत नाही. ही तक्रार करणाऱ्या व्यक्तीने कार्यक्रम स्वतः पाहिल्याचे प्रथमदर्शनी दिसत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.