"म्हातारी झाली,वेगळीच दिसते...", आई झाल्यानंतर रुबिना दिलैकला ऐकावे लागले टोमणे, अभिनेत्रीने दिलं सडेतोड उत्तर, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 11:08 IST2026-05-16T11:06:56+5:302026-05-16T11:08:29+5:30
आई झाल्यानंतर अभिनेत्री बॉडी शेमिंगमुळे ट्रोल;दिलं सडेतोड उत्तर, म्हणाली...

"म्हातारी झाली,वेगळीच दिसते...", आई झाल्यानंतर रुबिना दिलैकला ऐकावे लागले टोमणे, अभिनेत्रीने दिलं सडेतोड उत्तर, म्हणाली...
Rubina dilaik Reacts Strongly to Body Shaming: टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री रुबीना दिलैक या नावाला कोणत्याही परिचयाची गरज नाही. आजवर अनेक टीव्ही मालिका, रिअॅलिटी शोज च्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. रुबिना दिलैकने वर्षभरापूर्वी जुळ्या मुलींना जन्म दिला. सध्या ती मातृत्वाचा आनंद घेत आहे. रुबिना आणि अभिनव शुक्ला यांच्या जुळ्या मुलींची नावं जीवा आणि इधा अशी आहेत.मात्र, आई झाल्यानंतर, वाढलेल्या वजनावरून आणि दिसण्यावरून अभिनेत्रीला ट्रोलही करण्यात आले होते. नुक्त्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने ट्रोलिंग आणि बॉडी शेमिंगवर भाष्य केलं आहे.तसंच ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलंय.
अलिकडेच रुबिना दिलैकने 'झुम'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत रुबिना म्हणाली की,सुरुवातीला ट्रोलिंग वगैरे या गोष्टींचा तिच्यावर परिणाम व्हायचा, पण आता रुबिनाला यामुळे काहीच फरक पडत नाही. दरम्यान, अभिनेत्रीने म्हटलं," जे लोक मला नीट ओळखतही नाहीत त्यांना मी बोलताना ऐकलंय की म्हातारी झाली आहे, वेगळीच दिसते. कदाचित तिने बोटॉक्स किंवा सर्जरी करून घेतली असेल."
या पुढे मग अभिनेत्री म्हणाली, "पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे की, लोक काय विचार करतात यावर आपण काहीच करु शकत नाही. पण,ट्रोलिंगवर कशा पद्धतीने व्यक्त व्हायचं या गोष्टी आपल्या हातात आहेत. याआधी मी यावर लगेच रिअॅक्ट व्हायचे त्याचा माझ्या मानसिकतेवर खूप मोठा परिणाम झाला. पण, नंतर मला जाणवलं मी जर यावर प्रतिक्रिया देत राहिले तर लोक आणखीनच बोलत राहतील. म्हणून, याकडे लक्ष देऊन आपली एनर्जी वाया घालवण्यापेक्षा त्याकडे दूर्लक्ष केलेलं बरं. "
चांगलं दिसण्याचं प्रेशर...
यावेळी रुबिना म्हणाली,"चांगलं दिसण्याचं प्रेशर का असावं? हे पाहून वाईट वाटतं.आजकाल प्रत्येक मुलगी आणि स्त्रीला एका विशिष्ट प्रकारे दिसायचं असतं. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. तुमचे ओठ,नाक असेच असले पाहिजे, असं काहीसं चित्र आहे. जो पर्यंत तुम्ही चांगले दिसत नाहीत, तोवर या शर्यतीत मागे राहता. असा अनेकांचा समज आहे. हल्ली प्रत्येकाला आपण खास असावं, दिसावं असं वाटतं. पण, देवाने आपल्या प्रत्येकामध्ये काहीतरी वेगळेपण दिलं आहे, हे आपण कधी स्विकारणार." असं स्पष्ट मत अभिनेत्रीने व्यक्त केलं.