"धर्म वेगळा असल्याने वडिलांचा आमच्या नात्याला...", अरबाजने प्रपोज केल्यानंतर निक्की तांबोळी भावुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 10:41 IST2026-02-13T10:41:05+5:302026-02-13T10:41:44+5:30
या क्षणाची मी वाट पाहत होते पण..., निक्की तांबोळीचा खुलसा

"धर्म वेगळा असल्याने वडिलांचा आमच्या नात्याला...", अरबाजने प्रपोज केल्यानंतर निक्की तांबोळी भावुक
'द ५०' शोमध्ये सहभागी झालेले निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल चर्चेत आहेत. बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये असताना दोघं प्रेमात पडले. तेव्हापासून ते रिलेशनशिपमध्ये आहेत. द ५० शोमध्ये दोघं एकत्र सहभागी झाले. तिथे त्यांच्यात थोडी नोकझोकही झाली. मात्र दोघांमधलं प्रेम कमी झालेलं नाही. नुकतंच अरबाजने निक्कीला नॅशनल टेलिव्हिजनवरच प्रपोज केलं. निक्की भावुक झाली. यावेळी निक्कीने अरबाज दुसऱ्या धर्माचा असल्याने निक्कीच्या वडिलांचा त्यांच्या नात्याला विरोध असल्याचा खुलासा केला.
द ५० शोच्या गेल्या एपिसोडमध्ये निया शर्मा आणि उर्फी जावेद गेस्ट म्हणून आले होते. दोघींनी स्पर्धकांना मजेशीर टास्क दिले. मुलांना मुलींना इम्प्रेस करण्याचा टास्क दिला होता. अरबाज पटेलने गर्लफ्रेंड निक्कीला गुडघ्यावर प्रपोज केलं. अरबाज म्हणाला की तो निक्कीला कलर्सच्या शोमध्येच भेटला आणि आता तो कलर्सवरच तिला प्रपोज करत आहे. अरबाज स्टेजवर आला आणि म्हणाला की, "माझ्यात बरंच टॅलेंट आहे. मी अनेकांना इम्प्रेस केलं आहे. पण कलर्सवरच कोणीतरी मला इम्प्रेस केलं होतं. निक्की मला बऱ्याचदा बोलायची की आपण एकमेकांना अजूनपर्यंत ऑफिशियली प्रपोज केलेलं नाही. कलर्सनेच आमची जोडी बनवली होती त्यामुळे मी विचार केलेला की परत संधी मिळाली तर कलर्सवरच निक्कीला प्रपोज करेन."
पुढे अरबाज निक्कीला स्टेजवर घेऊन येतो आणि गुडघ्यावर बसून तिला प्रपोज करतो. 'माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. मी रागात असेन तर निक्कीला पाहून माझा रागही शांत होतो. मला निक्कीशिवाय इतर कोणीच शांत करु शकत नाही. अगदी घरातलेही नाही."
अरबाजचं हे प्रपोजल पाहून निक्की भावुक होते. तिच्या डोळ्यातून पाणी येतं. ती म्हणते, "हा क्षण माझ्या आयुष्यात यावा असं मला कायम वाटायचं. पण मला भीतीही वाटतीये कारण माझे वडील या नात्याच्या विरोधात आहेत. आमचा धर्म वेगळा आहे. गेल्या दीड वर्षापासून आम्ही रिलेशनशिपमध्ये आहोत. पण माझे वडील या नात्याचा स्वीकार करत नाहीयेत. मी माझ्या वडिलांच्या इच्छेविरोधात हे करत आहे कारण माझ्या आईने मला कायम हेच शिकवलं की कोणासाठी आपल्या प्रेमाचा त्याग कधीही करायचा नाही. वडिलांचं प्रेम वेगळं आणि एका पार्टनरचं प्रेम वेगळं. माझे वडील आमच्या प्रेमाला समजून घेतील अशी मला आशा आहे. कारण माझं अरबाजवर खूप प्रेम आहे."
अरबाज पटेल आणि निक्की तांबोळी हे टेलिव्हिजनवरील चर्चेतलं कपल आहे. दोघं मुंबईत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात. बिग बॉस मराठीनंतर त्यांना कमालीची प्रसिद्धी मिळाली. अनेकदा दोघं व्हेकेशनवरही जातात तेव्हा त्यांचे कित्येक फोटो व्हायरल झाले आहेत. टीव्हीवरचं हॉट कपल म्हणूनही त्यांना ओळखलं जातं.