"तू कित्येकदा घरी यायला आमंत्रण दिलंस, पण..."; प्रथमेश कदमच्या निधनानंतर अंकिता भावुक, म्हणाली- "आज तुझ्या आईला..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2026 16:05 IST2026-01-26T16:02:58+5:302026-01-26T16:05:10+5:30
प्रथमेश अनेकांचा आवडता सोशल मीडिया स्टार होता. त्याचे अनेक मित्रही होते. अशातच कोकण हार्टेड गर्ल अर्थात अंकिता वालावलकरने प्रथमेशविषयी भावुक पोस्ट लिहिली आहे.

"तू कित्येकदा घरी यायला आमंत्रण दिलंस, पण..."; प्रथमेश कदमच्या निधनानंतर अंकिता भावुक, म्हणाली- "आज तुझ्या आईला..."
मराठमोळा रिल स्टार आणि इन्फ्लुएन्सर प्रथमेश कदमचं आज निधन झालं. प्रथमेशच्या निधनामुळे त्याच्या सर्व चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. प्रथमेश गेल्या काही दिवसांपासून आजारी होता. आज त्याची प्राणज्योत मालवली. प्रथमेश अनेकांचा आवडता सोशल मीडिया स्टार होता. त्याचे अनेक मित्रही होते. अशातच कोकण हार्टेड गर्ल अर्थात अंकिता वालावलकरने प्रथमेशविषयी भावुक पोस्ट लिहिली आहे.
अंकिताची प्रथमेशसाठी व्यक्त केली खंत
अंकिताने सोशल मीडियासमोर प्रथमेशचा फोटो पोस्ट करुन लिहिलंय की, ''प्रथमेश आज तुझ्या अंत्यदर्शनाला तुझ्या घरी आले. तू कित्येक वेळा घरी यायला आमंत्रण दिलंस, पण कधीच येणं जमलं नाही. आज तुझ्या आईला हतबल पाहून काय घडलंय, हे क्षणभर कळलंच नाही. ज्या घरात कधी येता आलं नाही, त्या घरात आज तुझं शेवटचं दर्शन घ्यावं लागेल असं वाटलंच नव्हतं. काही नाती वेळेवर निभावता आली नाहीत, काही भेटी राहून गेल्या ह्याची खंत राहील.... जिथे असशील तिथे असंच हसत रहा!''
अशा शब्दात अंकिताने प्रथमेशसाठी भावुक पोस्ट लिहिली आहे. प्रथमेश कदमच्या वडिलांचं काही वर्षांपूर्वी निधन झालं होतं. त्यानंतर प्रथमेशने घराची सर्व जबाबदारी सांभाळली. आईवर दुःखाचा डोंगर कोसळला असतानाही प्रथमेशने आईला नव्याने आयुष्य जगण्याची उमेद दिली. प्रथमेश आणि त्याची आई प्रज्ञा या दोघांचे रिल सोशल मीडियावर चांगलेच चर्चेच असायचे. दोघांची जोडी सर्वांची आवडती होती. या कठीण काळात प्रथमेशचे असंख्य चाहते त्याच्या आईच्या पाठीशी असून त्यांना आधार देत आहेत.
