भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 13:32 IST2026-04-13T13:31:40+5:302026-04-13T13:32:39+5:30
आशा भोसलेंच्या नातीला भेटून सर्वांनीच तिला धीर दिला. यावेळी प्रत्येकालाच अश्रू लपवणं कठीण जात होतं.

भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
भारतीय संगीत विश्वातील एक तेजस्वी तारा निखळला आहे. आपल्या अद्वितीय आवाजाने जागतिक स्तरावर ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. छातीत संसर्ग आणि थकवा जाणवू लागल्याने त्यांना शनिवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र रविवारी, १२ एप्रिल रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे मंगेशकर-भोसले कुटुंबासह संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.
आशाताईंचे पार्थिव सकाळी दहा पासून लोअर परेल येथील त्यांच्या 'कॅसा ग्रँड या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. यावेळी बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनी त्यांचे अंतिम दर्शन घेतले. अभिनेत्री तब्बू हिने आशाताईंची नात जनाई भोसले हिचे सांत्वन केले. तेव्हा जनाई तब्बूच्या गळ्यात पडून रडली आणि तिने भावनांना वाट मोकळी करुन दिली. आशा भोसले यांना पोलिसांनी मानवंदना दिली तेव्हाही जनाईला अश्रू अनावर झाले होते. पीटीआयने हा व्हिडीओ x वर शेअर केला आहे.
VIDEO | Mumbai: Actor Tabu gets emotional as she arrives to pay tribute to legendary singer Asha Bhosle at her residence in Grande, Lower Parel. She hugs and consoles Zanai Bhosle, granddaughter of Asha Bhosle.
— Press Trust of India (@PTI_News) April 13, 2026
(Full video available on PTI Videos - https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/fdGrYRyvtn
आशा भोसले यांचे पार्थिव पांढऱ्या लिलीच्या फुलांनी सजवलेल्या शवपेटीत ठेवण्यात आले असून, त्यावर राष्ट्रध्वज आहे. आपल्या आवडत्या गायिकेला अखेरचा निरोप देण्यासाठी शिवाजी पार्क परिसरात चाहत्यांची आणि मान्यवरांची मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला आहे.
आशा भोसले यांचं पार्थिव सध्या लोअर परळ येथील निवासस्थानी आहे. आतापर्यंत अनेक दिग्गजांनी या ठिकाणी येऊन त्यांचे अंत्यदर्शन घेतले. सचिन तेंडुलकर, अनुराधा पौडवाल, रितेश देशमुखसह राजकीय कलाविश्वातील नेत्यांनीही आशा ताईंना साश्रूनयनांनी निरोप दिला. आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज दुपारी दादर येथील शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.