"माझ्या जागी दुसऱ्यानेच मत दिलं...", तमिळनाडू निवडणूक मतदान प्रक्रियेवर अभिनेत्री भडकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 14:59 IST2026-04-24T14:58:30+5:302026-04-24T14:59:03+5:30

तमिळ अभिनेत्रीने सोशल मीडियावर व्यक्त केला संताप

tamil actress akshaya hariharan disappointed on tamilnadu voting as someone else casted voted in the name of her | "माझ्या जागी दुसऱ्यानेच मत दिलं...", तमिळनाडू निवडणूक मतदान प्रक्रियेवर अभिनेत्री भडकली

"माझ्या जागी दुसऱ्यानेच मत दिलं...", तमिळनाडू निवडणूक मतदान प्रक्रियेवर अभिनेत्री भडकली

तमिळनाडू विधानसभा निवडणूक २०२६ साठी गुरुवारी, २३ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत सर्वसामान्यांपासून दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारांनी मतदान केलं. मात्र, यादरम्यान तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरन हिच्यासोबत एक धक्कादायक प्रकार घडला. अक्षया जेव्हा मतदान केंद्रावर पोहोचली, तेव्हा तिला समजले की तिच्या नावाने आधीच कोणीतरी मतदान केले आहे.

अक्षयाने या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर शेअर करत संताप व्यक्त केला आहे. तिने सांगितले की, "मी वेलाचेरी येथील रहिवासी असून मला मतदानाची पावती मिळाली नव्हती. ऑनलाइन माहितीनुसार माझे मतदान केंद्र अडियार येथे असल्याचे समजले. तिथे पोहोचून तासभर वाट पाहिल्यानंतर मला कळाले की, माझ्या नावावर आधीच कोणीतरी मतदान केले आहे. ही बाब अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक आहे."

निवडणूक प्रक्रियेतील त्रुटींवर बोट ठेवताना अक्षया पुढे म्हणाली की, "कागदपत्रावर माझे आडनाव आणि सर्व माहिती बरोबर होती पण फोटो चुकीचा होता. त्यावर एका २४ वर्षीय महिलेचा दुसरा फोटो लावलेला होता आणि तिचे फिंगरप्रिंट्स घेण्यात आले होते. निवडणूक अधिकाऱ्यांनी आधीच तपासणी करायला हवी होती, माझ्या नावाने दुसरी व्यक्ती मतदान कशी काय करू शकते?" असा सवाल तिने उपस्थित केला आहे.

या गोंधळानंतर अक्षयाने मतदान केंद्रावर बराच वेळ प्रतीक्षा केली आणि कायदेशीर सल्ला घेतल्यानंतर 'चॅलेंज व्होट' (वैकल्पिक मत) नोंदवले. मात्र, या प्रक्रियेवर तिने असमाधान व्यक्त केले आहे. "मी मतदान तर केले, पण ते केवळ एका कागदावर होते आणि माझ्यासमोर ते सील देखील करण्यात आले नाही. त्यामुळे मला खरोखर मतदान केल्यासारखे वाटतच नाहीये," अशी खंत तिने व्यक्त केली.

अक्षयाने इंस्टाग्राम स्टोरीवरही आपला फोटो शेअर करत चाहत्यांना आवाहन केले आहे. तिने लिहिले की, "मशीनमध्ये (EVM) मत टाकल्यावर जो अनुभव येतो, तसा अनुभव मला या कागद आणि पाकिटाच्या प्रक्रियेत आला नाही. पण यापेक्षा चांगले मी काही करू शकत नव्हते. तरीही मी सर्वांना सांगू इच्छिते की, आपले मत वाया घालवू नका." अक्षयाने याप्रकरणी आरओ (RO) कार्यालयात रीतसर तक्रार दाखल करणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.

तामिळनाडूच्या या निवडणुकीत अक्षया हरिहरन व्यतिरिक्त रजनीकांत, थलापती विजय, कमल हासन, धनुष, श्रुति हासन आणि थाला अजित कुमार यांसारख्या बड्या स्टार्सनी रांगेत उभे राहून आपला मतदानाचा हक्क बजावला. मात्र, अक्षयासोबत घडलेल्या या प्रकारामुळे निवडणूक प्रशासनाच्या कारभारावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

Web Title : तमिल अभिनेत्री ने पाया कि किसी और ने उसके लिए वोट किया; गुस्सा व्यक्त किया।

Web Summary : तमिल अभिनेत्री अक्षया हरिहरन को पता चला कि किसी ने पहले ही उसके नाम पर वोट डाल दिया था। उन्होंने चुनाव प्रक्रिया में खामियों को उजागर करते हुए आक्रोश व्यक्त किया और शिकायत दर्ज कराई। बड़े सितारों ने भी वोट डाला।

Web Title : Tamil actress finds someone else voted for her; expresses outrage.

Web Summary : Tamil actress Akshaya Hariharan discovered someone had already voted in her name. She expressed outrage, highlighting flaws in the election process and filing a complaint. Big stars also voted.