राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 11:17 IST2026-05-01T11:09:36+5:302026-05-01T11:17:04+5:30
राजश्री देशपांडेची प्रेरणादायी पोस्ट

राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
अभिनेत्री राजश्री देशपांडेने सध्या आगामी 'बाप्या' सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमाच्या प्रमोशनमध्ये ती व्यग्र आहे. अलीकडेच तिने ब्रेस्ट कॅन्सरबद्दल, त्यावरील उपचार आणि शस्त्रक्रियेबाबत अत्यंत मोकळेपणाने भाष्य केले. निदानानंतर अनेक महिन्यांनी तिने तिच्या 'हीलिंग जर्नी'ची एक वैयक्तिक झलक सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केली आहे. यामध्ये तिने आपल्या शरीरावरील ब्रेस्ट कॅन्सर सर्जरीचे व्रण अभिमानाने दाखवले असून, हे व्रण तिच्या ताकदीचे आणि धैर्याचे प्रतीक असल्याचे म्हटले आहे.
जिथे ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये बाह्य रूपाला आणि परफेक्शनला सर्वाधिक महत्त्व दिले जाते, तिथे राजश्रीने आपल्या जखमांना जगासमोर आणून एक महत्त्वाचा संदेश दिला आहे. इन्स्टाग्रामवर तिने लिहिले की, "माझ्या शरीरावरील या जखमा मी जिवंत असण्याची गोष्ट सांगतात. प्रत्येक जखम मला याची आठवण करून देते की मी ही लढाई लढले, त्यातून वाचले आणि त्यावर विजय मिळवला आहे. ब्रेस्ट कॅन्सरने व्रण मागे सोडले असले तरी तो माझ्या आत्म्याला कधीच स्पर्श करु शकणार नाही. प्रत्येक महिलेला मी हे सांगू इच्छिते की तुझी जिद्द कमी होण्यापूर्वी ती पुन्हा उभी राहा. तू सुंदर आहेस आणि तुझ्या अंगावरील हे व्रण डाग नसून तुमच्या धैर्याचा मुकूट आहे. आज मी माझ्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी प्रेमाने, हिंमतीने आणि पूर्ण आत्मविश्वासाने उभी आहे. आयुष्य भरभरुन जगण्याची ही वेळ आहे."
सोशल मीडियावर राजश्रीच्या या हिंमतीचे खूप कौतुक होत आहे. दिया मिर्झा, अमृता खानविलकर, शुभांगी लाटकर आणि शिल्पा तुळसकर यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी तिच्या हिंमतीची दाद दिली आहे. चाहत्यांनी देखील तिचे कौतुक केले असून, सौंदर्याची व्याख्या बदलणाऱ्या तिच्या या साहसाला सोशल मीडियावर मोठी पसंती मिळत आहे.