यूट्यूबरच्या आयुष्यात अभिनेत्रीची एन्ट्री! डान्सर, मॉडेल आणि बरंच काही... कोण आहे रणवीरची लेडी लव्ह जूही भट्ट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 15:13 IST2026-04-14T15:06:51+5:302026-04-14T15:13:48+5:30

प्रसिद्ध यूट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अलाहाबादिया सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला असून, रणवीरने स्वतः आपल्या नात्याची अधिकृत कबुली दिली आहे.

रणवीर अलाहाबादिया अभिनेत्री आणि इन्फ्लुएन्सर जूही भट्ट हिला तो डेट करत असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

१२ एप्रिल रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात आयपीएल सामना पार पडला. हा सामना पाहण्यासाठी रणवीर आणि जूही एकत्र पोहोचले होते.

स्टेडियमच्या बाहेर जेव्हा एका चाहत्याने रणवीरला सेल्फीसाठी विचारले, तेव्हा त्याने अतिशय नम्रपणे नकार दिला आणि मी माझ्या गर्लफ्रेंडसोबत आहे," असे म्हणत त्याने पहिल्यांदाच जूहीचा उल्लेख आपली प्रेयसी म्हणून केला.

रणवीर आणि जूहीच्या अफेअरच्या चर्चा ऑक्टोबर २०२५ च्या दिवाळीपासून सुरू होत्या. रणवीरने त्याच्या दिवाळी सेलिब्रेशनचे काही फोटो शेअर केले होते, ज्यात त्याने एका मुलीची तिची झलक दाखवली होती.

त्याच दिवशी जूहीनेही अगदी तशीच फुलांची रांगोळी आणि गुलाबी गुलाबांच्या बुकेचा फोटो शेअर केला होता. तेव्हापासूनच चाहत्यांनी अंदाज बांधला होता की या दोघांमध्ये काहीतरी शिजतंय!

जूही भट्ट ही एक अभिनेत्री, डान्सर आणि डिजिटल कंटेंट क्रिएटर आहे. तिचे इंस्टाग्रामवर ४.५ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. मूळची डेहराडूनची असलेल्या जूहीने कथक आणि कंटेम्पररी डान्सचे प्रशिक्षण घेतले आहे. अभिनयात येण्यापूर्वी ती चित्रपट मार्केटिंग क्षेत्रात कार्यरत होती.

तिने 'तुमसे ना हो पायेगा' या वेब सीरिजमध्ये मुख्य भूमिका साकारली आहे. तसेच ती 'फिल्टर कॉपी'च्या अनेक लोकप्रिय व्हिडिओंमध्ये झळकली आहे. जूहीने फुकरे ३ मधील या गाण्यातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. याशिवाय ती 'भय: द गौरव तिवारी मिस्ट्री' या सीरिजमध्येही दिसली होती.

यापूर्वी रणवीर अलाहाबादिया याचे नाव अभिनेत्री निक्की शर्माशी जोडले गेले होते. मात्र, काही काळापूर्वी त्यांनी एकमेकांना अनफॉलो केल्याने त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगल्या होत्या. आता जूहीसोबतच्या नात्याची अधिकृत कबुली त्याने दिली आहे.