'मुन्नाभाई MBBS' मधील अभिनेता १० वर्षापासून बेपत्ता; गर्लफ्रेंडचाही हार्टअटॅकनं मृत्यू, गूढ कायम!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 08:19 IST2026-05-07T08:15:07+5:302026-05-07T08:19:10+5:30

अभिनेता विशाल ठक्कर २००० च्या सुरुवातीच्या दशकात बॉलिवूडमधील परिचित असलेला एक चेहरा होता. भलेही तो कधी मोठा हिरो बनला नाही परंतु छोट्या छोट्या भूमिकांमधून विशालने लोकांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.

विशालच्या प्रसिद्ध भूमिकांपैकी एक संजय दत्त याच्या मुन्नाभाई MBBS सिनेमातील आहे. या सिनेमात विशालने अशा मुलाची भूमिका साकारली जो गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप झाल्याने आत्महत्येचा प्रयत्न करतो. त्याशिवाय विशालने चांदनी बार, टँगो चार्लीसारख्या सिनेमातही काम केले आहे.

सिनेमासोबतच विशालने टेलिव्हिजन क्षेत्रात सास भी कभी बहू थी, तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकांमध्येही काम केले आहे. परंतु विशालचं गूढ रहस्य आजही कायम आहे. २०१५ पासून अचानक विशाल बेपत्ता झाला आहे. आजतागायत विशालबाबत कुठलीही माहिती कुणाकडे नाही.

३१ डिसेंबर २०१५ ला घरातून सिनेमा पाहण्यासाठी बाहेर पडलेला विशाल अद्याप घरी परतला नाही. रात्री १०.३० वाजता विशालने त्याच्या आईकडून ५०० रूपये घेतले आणि मुलुंड येथील त्याच्या घरातून बाहेर पडला. त्यानंतर १ जानेवारी २०१६ साली रात्री १ च्या सुमारास त्याने वडिलांना मेसेज केला होता. तो एका पार्टीत आहे. सकाळपर्यंत येतो असं त्याने कळवले. परंतु त्यानंतर त्याचा कुठलाही थांगपत्ता नाही

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, विशालला त्याच्या गर्लफ्रेंडने १ जानेवारी रोजी सकाळी ११:४५ च्या सुमारास घोडबंदर रोडवर शेवटचे पाहिले होते. तिथून तो एका शूटिंगसाठी अंधेरीला जाणार असल्याने त्याने ऑटो पकडली. त्यानंतर त्याचा फोन बंद झाला. पोलिसांना कोणत्याही रुग्णालयात त्याच्या ओळखीशी जुळणारी व्यक्ती सापडली नाही. तेव्हापासून त्याच्या बँक खात्यावर कोणताही व्यवहार झालेला नाही.

गर्लफ्रेंडवरही संशय - विशालच्या कुटुंबीयांनी तो हरवल्याची तक्रार दाखल केली होती, पण त्यावेळी या प्रकरणाला माध्यमांमध्ये फारसे स्थान मिळाले नाही. मात्र त्याची कहाणी वेळोवेळी सोशल मीडिया आणि इंटरनेटवर पुन्हा समोर येते. विशालला काय झाले हे जाणून घेण्यासाठी त्याचे कुटुंबीय आणि चाहते अजूनही वाट पाहत आहेत.

२०२१ च्या एका रेडिट पोस्टनुसार या प्रकरणाचा तपास करणारे माजी अधिकारी महेंद्र पुरी म्हणाले, "सुरुवातीला आम्हाला त्याच्या गर्लफ्रेंडवर संशय होता, पण तिच्या जबाबात काहीही चुकीचे आढळले नाही. तर हे प्रकरण हत्येचे आहे, अपहरणाचे आहे की विशाल स्वतःहून कुठे गेला आहे हे पोलिसांना कळू शकले नाही असं आणखी एका पोलीस अधिकाऱ्यानेही सांगितले.

विशेष म्हणजे विशाल बेपत्ता होण्याच्या सुमारे तीन महिने आधी त्याच्या गर्लफ्रेंडने त्याच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. त्या मुलीने पोलिसांत तक्रारही दाखल केली होती. मात्र नंतर दोघांमध्ये तडजोड झाली आणि तिने तक्रार मागे घेतली.

काही महिन्यांनंतर विशालची गर्लफ्रेंडसुद्धा तिच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळली तेव्हा हे प्रकरण अधिकच गूढ बनले. प्राथमिक अहवालानुसार हृदयविकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू झाला होता. आजपर्यंत विशाल ठक्करचा कोणताही मागमूस लागलेला नाही. तो बेपत्ता होऊन १० वर्षे झाली आहेत.

विशालवर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर त्याचे करिअर पूर्णपणे संपुष्टात आले होते. त्यामुळे तो नैराश्येत होता असे त्याची आई दुर्गा यांचे म्हणणं होते. या प्रकरणी पोलिसांनी १०० हून अधिक लोकांकडे चौकशी केली मात्र त्याच्याबाबत काहीच माहिती त्यांच्या हाती लागलेली नाही.
















