हिला लोक ‘इंडियन रिहाना’ म्हणून ओळखतात! पाहून तुम्हीही म्हणाल सेम टू सेम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2021 08:00 AM2021-02-05T08:00:00+5:302021-02-05T08:00:02+5:30

रेने हे भारतीय मॉडेल आहे. पण ती दिसते ती हुबेहुब रिहानासारखी.

सध्या भारतात इंटरनॅशनल पॉपस्टार रिहानाची जबरदस्त चर्चा आहे. शेतकरी आंदोलनावर रिहानाने टिष्ट्वट केले आणि भारतात रिहाना कधी नव्हे इतकी चर्चेत आली. पण आता आम्ही पॉपस्टार रिहानाबद्दल नाही तर इंडियन रिहानाबद्दल सांगणार आहोत.

होय, ही ‘देसी रिहाना’ ख-याखु-या रिहानाशी इतकी मिळतीजुळती आहे की दोघींमध्ये फरक करणे कठीण आहे. आम्ही बोलतोय ते छत्तीसगडच्या जशपूर जिल्ह्यातील बागीचा येथे राहणा-या रेने कुजूरबद्दल.

रेने हे भारतीय मॉडेल आहे. पण ती दिसते ती हुबेहुब रिहानासारखी. रेने कुजूरचे नाव कदाचित तुमच्यासाठी नवे असेल. पण मॉडेलिंगशी संबंध असलेल्यांसाठी हे नाव नवे नाही.

आज रेने भारताची टॉप मॉडेल आहे.तिचे आज कोट्यवधी चाहते आहेत. तिचे फोटो इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत असतात. या रेनेला तिच्या काळ्या वर्णामुळे बरेच काही सहन करावे लागले होते.

रेनेला आजही तिच्या बालपणीचा तो किस्सा आठवतो. फॅन्सी ड्रेस कॉम्पिटीशनमध्ये ती परी बनून गेली होती. तिला पाहून लोक हसू लागलेत. बघा बघा, काळी परी आली, म्हणून तिची खिल्ली उडवू लागलेत. रेने रडत रडत स्टेजवरून निघून गेली. आज तेच अश्रू रेनेची ओळख आहेत.

मॉडेलिंगचे स्वप्न घेऊन ती जेव्हा या जगात पोहोचली, तेव्हा तिला अनेकदा नकार पचवावे लागलेत. काळा रंग, त्यात इंग्रजीची बोंब त्यामुळे कुणीच तिला आपल्या प्रोजेक्टमध्ये घ्यायला तयार होईना.

अनेक फोटोग्राफर्स सर्वातआधी मेकअप आर्टिस्टला तिचा स्किनटोन फिका करायला सांगायचे. यानंतर तिचे फोटोज बरेच एडिट केले जायचे.

‘बघ, सुंदर मुलींना कुणीही सुंदर बनवू शकते. पण मी काळ्याकुट्ट मुलीला सुंदर बनवले,’ असे म्हणत एक फोटोग्राफर रेनेसमोर फिदीफिदी हसला होता, आजही रेने तो क्षण विसरू शकली नाही.

एकदा एका मित्राने रेनेला तू रिहानासारखी दिसतेस, असे सांगितले आणि मेकअपशिवाय तिचा एक फोटो घेतला. आधी त्या मित्राच्या गोष्टींवर रेने खूप हसली. पण नंतर प्रत्येकजण तिला हेच म्हणू लागला. मग फोटोग्राफर्स क्लाएंटलाही हेच सांगू लागले. रेने ‘इंडियन रिहाना’ आहे, अशीच तिची ओळख बनली. यानंतर कुणी कधीच तिची खिल्ली उडवली नाही.

रिहानाला लोक सेक्सी अन् सुंदर मानतात. रेने रिहानासारखी दिसते, असे समजल्यानंतर रेनेलाही लोक सुंदर म्हणू लागलेत. रेने यासाठी रिहानाचे आभार मानू इच्छिते. कारण रिहाना नसती तर कदाचित रेनेचा संघर्ष असाच सुरु असता. ती सुंदर आहे, हे तिला कदाचित प्रत्येकवेळी तिला लोकांना पटवून द्यावे लागले असते.

टॅग्स :रिहानाRihanna